ताडोबा प्रकल्पात रोजगाराच्या संधी : अगरबत्ती व चरखा उद्योग प्रकल्पामुळे लाभचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारा देशातील महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून उदयास आला आहे. दरवर्षी वाढत जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमुळे हा प्रकल्प जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत असून लगतच्या गावांमध्ये प्रकल्पामुळे आर्थिक समृध्दी आली आहे. येथे चरखा व अगरबत्ती प्रकल्प सुरू असून ८८ बेरोजगार युवकांना गाईड म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. बफर क्षेत्राच्या मोहुर्ली परिक्षेत्रातील आगरझरी या गावातील २० बेरोजगार युवकांना गाईड म्हणून नियुक्ती झाली आहे. तर जुनोना गावातील १५, देवाडा व अडेगाव येथील १५, पळसगाव परिक्षेत्रातील कोलारा गावातील १४, खडसंगी परिक्षेत्रातील अलीझंझा व किटाळी गावातील १४ अशा ८८ बेरोजगार युवकांना गाईडच्या माध्यमातून हक्काचा रोजगार प्राप्त झाला आहे.बफर क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मामला ते चोरगाव निसर्ग पर्यटन मार्ग तसेच पांगडी ते खातेरा निसर्ग पर्यटन मार्गाचे काम केले जात आहे. या पर्यटन सर्किटमध्ये पर्यटकांसाठी विशेष सुविधा निर्माण करणे, उत्तम सुविधा निर्माण करण्यासोबतच स्थानिक रहिवाश्यांना पर्यटन विकासाकरिता विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. मोहुर्ली परिक्षेत्राअंतर्गत बोटींग पर्यटन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे तीन गावांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.इको समितीमार्फत टुरिझम कॉम्पलेक्स, होम स्टे, कॅम्पिंग साईट व टेन अशी पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच कोलारा नेचरट्रेल व सायकल ट्रेल तयार करण्यात येत आहे. याचा निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासोबतच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होणार आहे.बफर क्षेत्रात रोजगाराच्या अनुषंगाने दोन गावात चरखा उद्योग प्रकल्प सुरु करण्यात आले असून आणखी एका गावात प्रकल्प सुरु होणार आहे. क्षेत्रातील आगरझरी, भगवानपुर, पळसगाव येथे महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्यात आले. तर अलीझंझा, देवाडा, जुनोना येथेही अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आगरझरी येथे अगरबत्तीच्या काळ्या तयार करण्याचा प्रकल्पही लवकरच सुरु होणार आहे.यासोबतच बफर क्षेत्रातही रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून अडेगाव येथे दुध प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. लगतच्या तीन गावात कुक्कुटपालन उद्योग लवकरच सुरु होणार आहे. कोंडेगाव, भामढेळी व सितारामपेठ येथे इको विकास समितीमार्फत इरई जलाशयात बोटींग सुरु करण्यात आल्या आहे. जलाशयात भ्रमंतीसाठी तीन अत्याधुनिक पंटून बोट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये २४ मुलांना गाईड, बोट ड्रायव्हर व इतर सुविधा पुरविण्याकरिता रोजगार उपलब्ध झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)जिप्सीधारकांना ७० टक्के अनुदानमोहुर्ली व खडसंगी परिक्षेत्रात पर्यटनाकरिता ३६ मान्यताप्राप्त जिप्सीधारकांना जिप्सी व्यवसायाकरिता परतफेडी तत्वावर ७० टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीपुरक बाबींसाठी प्रोत्साहीत केले जात असून २२० शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर वनशेती अंतर्गत ५ लाख ८४ हजार ६३६ निलगिरी रोपांचा पुरवठा करण्यात आला आहे. ही रोपे मोठी झाल्यानंतर यातूनही शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.
८८ बेरोजगार युवक झाले गाईड
By admin | Updated: September 30, 2016 00:58 IST