६ ते १४ वयोगटातील कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात १ ते १० मार्च या कालावधीत शाळाबाह्य, अनियमित आणि स्थालांतरित मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. कोरोनाच्या संसर्गातही शाळाबाह्य मुले शोधणाऱ्या पथकांनी घरोघरी, वीटभट्टी, रेल्वे फलाट, नवीन वस्त्या, रस्त्याच्या किनाऱ्यावर हंगामी मुक्कामी असलेले कुटुंब, गर्दीची ठिकाणे येथे जाऊन सर्वेक्षण केले. यावेळी काही कुटुंबांचे स्थलांतर झाल्याचे लक्षात आले, तर जिल्ह्यात तब्बल १०७ शाळाबाह्य मुले आढळून आली. यासोबतच गरजाधिष्ठित तसेच कधीही शाळेत न गेलेली मुले आढळून आली. सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहेत.
बॉक्स
चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक
जिल्ह्यात राबविलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत सर्वाधिक मुले चंद्रपूर तालुक्यात आढळून आली. जिल्ह्यात आढळलेल्या १०७ मुलांपैकी ४२ मुले एकट्या चंद्रपूर तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ भद्रावती व नागभीड तालुक्यात १३ मुले आढळून आली आहेत. चंद्रपूर येथे रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत.
बॉक्स
मुलींची संख्याही लक्षणीय
अद्याप मुलींच्या शिक्षणाबाबत पालक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक मुलींना बालपणापासून घरगुती कामात गुंतवले जात आहे. त्यामुळे शाळाबाह्य मुले शोधमोहिमेत मुलींची संख्या लक्षणीय आढळून आली आहे. पालकांनी गांभीर्याने घेऊन मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे.
बॉक्स
बाल कल्याण विभागाचे सहकार्य
शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेस शिक्षकांसोबत बाल कल्याण विभागातील मदतनीस, पर्यवेक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात आले. या मोहिमेद्वारे ३ ते १८ वर्षे वयोगटांतील मुलांचा शोध घेण्यात आला. ३ ते ६ वयोगटांतील शाळाबाह्य मुलांची नोंद बाल कल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.
कोट