सिंदखेडराजा : शहराला पाणी पुरवठा करणारा मोती तालाव आटला असून, पीरकल्याण धरणातही १५ दिवस पुरेल असा जेमतेम जलसाठा आहे. त्यामुळे शहरात तब्बल १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.शहराची लोकसंख्या १८ ते २0 हजाराच्या दरम्यान आहे. येथे पाणी पुरवठा करण्यासाठी मोती तलाव, बाळसमुद्र विहीर असून, देऊळगाव राजा व सिंदखेडराजा शहरासाठी संयुक्तिक पाणी पुरवठा पीरकल्याण धरणावरून सुरू आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी एकही दमदार पाऊस येथे झाला नाही. त्यामुळे सध्या बाळसमुद्र व मोती तलावातील जलसाठा आटला असून, संपूर्ण शहर आता पीरकल्याण धरणावर अवलंबून आहे. पीरकल्याण नळयोजनेमध्ये सिंदखेडराजा शहरासाठी ३३ टक्के पाणी मिळते. तेच पाणी नळाद्वारे शहरवासीयांना १५ दिवसाआड मिळत आहे. ते पाणीसुद्धा गढूळ व पिवळ्या रंगाचे आहे. त्यामुळे शहरात साथीचे आजारही डोके वर काढत आहेत. नगर परिषदेच्यावतीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २५ टँकर सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. लवकरच शहरातील पाणी पुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लागेल, असे नगराध्यक्ष नंदाताई मेहेत्रे यांनी सांगीतले.
सिंदखेड राजा शहरात १५ दिवसाआड पाणीपुरवठा
By admin | Updated: July 28, 2014 00:13 IST