मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पावर मोठा कालवा आहे. या कालव्याद्वारे हजारो हेक्टर शेती सिंचन होते. मात्र, हा कालवा डिसेंबर महिन्यात फुटल्याने या कालव्याद्वारे पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत नाही. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेली गावे वरवंड, उटी, पार्डी, घाटनांद्रा, गोमेधर याठिकाणी पाणी पोहोचत नाही. जसे कालव्यात मोठी झाडे, गवत, झुडपे असल्याने हे पाणी पाहिजे त्या प्रमाणात जोराने वाहत नाही. यामुळे कालव्याला काही ठिकाणी पाझर लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. सध्या रब्बी हंगामात कालव्याचे पाणी न मिळाल्यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यांचे गहू, हरभरा पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले.
पेनटाकळी प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. कालव्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी रब्बी हंगामात सिंचनापासून वंचित राहत आहेत. यामुळे उन्हाळी हंगामाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नियोजनही कोलमडले आहे.
कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कालव्याच्या दुरवस्थेमुळे कालव्याला काही ठिकाणी पाझर फुटले आहेत. काही ठिकाणी विद्युत पंप लावून अतिरिक्त पाणी उपसा करण्यात येत आहे. यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास वेळ लागत आहे.
एस. बी. चौगुले, उपविभागीय अभियंता, पेनटाकळी प्रकल्प, मेहकर.