नांदुरा : लाच घेतल्याप्रकरणी तहसीलदार खान यांच्या निलंबनानंतर तहसील कार्यालयाची अवस्था बेभरवशाची झाली असून प्रभारी तहसीलदार शेलार यांच्या कारकिर्दीत महत्वाच्या विभागातील कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची मोठय़ा प्रमाणावर हेळसांड होत आहे. येथील तहसीलदार खान यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे सद्या येथील तहसीलदारांचा प्रभार नायब तहसीलदार शेलार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने येथील तहसील कार्यालयातील महत्वाच्या विभागातील कर्मचार्यांची अनेकवेळा कार्यालयास दांडी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांचे काम होण्यासाठी चकरा माराव्या लागतात. या त्रासाला कंटाळून अखेर काहीजण नाईलाजाने दलालांच्या हातात पैसा सोपवून आपली कामे करुन मोकळे होतांना दिसतात. एकंदरीत राज्य शासनाचा महत्वाचा विभाग असलेल्या महसूल विभागाकडून सर्वसामान्याची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या विभागाबाबत सर्वत रोष व्यक्त होत आहे. काल २५ जुलै रोजी प्रभारी तहसीलदार शेलार हे अमरावती येथे गेले होते तर पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी गैरहजर असल्याने या विभागात शुकशुकाट दिसला. या विभागात नवीन रेशनकार्ड, दुय्यम रेशनकार्ड, अन्न सुरक्षा योजना तसेच इतर दाखल्यांसाठी मोठय़ा प्रमाणावर शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली होती. पुरवठा विभागामध्ये नेहमीच नागरिकांना नियमित कामासाठी त्रस्त केल्या जाते. जेणेकरुन दलालांना आयतीच संधी मिळते. परंतु जिल्हा प्रशासनाचा यावर कोणताच वचक नसल्याने सर्व सामान्यांची विविध कामासाठी आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे तहसील कार्यालयातील बहुसंख्य कर्मचारी बाहेरगावावरुन जाणे-येणे करतात. त्यामुळे कार्यालय उघडल्यानंतरही तास, दोन तास या कार्यालयात कुणीच नसते. कार्यालयात असलेली थंब इम्प्रेशनची मशीन नावापुरतीच आहे. लेटलतीफ कर्मचार्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने कर्मचार्यांची मुजोरी वाढली आहे.
नांदुरा तहसील कार्यालय वार्यावर
By admin | Updated: July 29, 2014 20:48 IST