सिंदखेडराजा : जि.प. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची घंटा २६ जूनला वाजली. मुलांची ओढ शाळेकडे लागली. परंतु सवडद येथील विद्यार्थ्यांना एसटी बसविनाच प्रवास करण्याची वेळ आली.एसटी महामंडळाची बसफेरी गावात बंद असल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना काळीपिवळी व इतर खासगी वाहनातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. साखरखेर्डा येथून सहा की.मी.अंतरावर सवडद गाव आहे. येथील ७0 ते ८0 विद्यार्थी मुलीसह साखरखेर्डा येथे ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेण्याकरीता येतात. सवडद गावातून सकाळी ६.३८, ८.३0 दुपारी ५ वाजता अशाप्रकारे मेहकर आगाराच्या तिन बसेस फेर्या मारीत होत्या. दोन दिवसापूर्वी वाहक आणि चालकासोबत मद्य प्राशन करुन एका प्रवाशाने वाद घातला होता. धमक्याही मिळाल्याने पुढील अनुचित प्रकार घडू नये, म्हणून वाहक चालकांनी सवडद गावात बस न नेण्याचा पवित्रा घेतला. प्रवाशी ऑटोने प्रवास करतील, पण विद्यार्थी कशाने प्रवास करतील, हा विषय गहण होत आहे. असे असतांना यावर ग्रामस्थ आणि आगार प्रमुख यांनी तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा पालकांची आहे. सवडद प्रमाणेच मोहाडी,शिंदी, गोरेगाव, काटेपांग्री, पिंपळगाव सोनारा, बाळसमुद्र, तांदूळवाडी, शेंदुर्जन येथील विद्यार्थी साखरखेर्डा येथे येतात. त्यांच्यासाठी मानव विकासाची बस सुरु करावी, ही अपेक्षा.
विद्यार्थी करतात जिवघेणा प्रवास
By admin | Updated: July 2, 2014 23:46 IST