लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, शेतमालास योग्य हमीभाव या व इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी खामगावात सर्व पक्षीयांच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसेच आंदोलकांनी कांदा रस्त्यावर फेकून आपला रोष करीत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला स्थानबद्ध केल्यानंतर सुटका करण्यात आली. खामगाव येथील आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आवामी विकास पार्टी आदी पक्ष संघटनांचा सहभाग होता. सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती, तर गल्लीबोळातील दुकाने काही प्रमाणात बंद होती. अत्यावश्यक समजली जाणारी शहरातील मेडिकल दुकाने तसेच बसस्थानकाजवळील पेट्रोल पंप वगळता इतर पेट्रोल पंप सुरू होते. बंदचे आंदोलन पाहता बसस्थानकावरही तुरळक गर्दी होती. शहरात बंदचे आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बाळापूर बायपासनजीक रास्ता रोको आंदोलन केले.
खामगावात बंद , रास्ता रोको
By admin | Updated: June 6, 2017 00:07 IST