बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. १८ जानेवारीला सकाळी मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर आता उमेदवारांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानाच्या टक्केवारीवरून गावागावात गावकारभाऱ्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ९ हजार २२९ उमेदवारंची चिंता वाढली आहे. मतदानानंतर निकालामध्ये दोन दिवसांचा अवधी मिळाल्याने गावागावात सध्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. आपल्या गावात किती मतदान झाले, त्यामध्ये वार्डातील मतदान किती होते, याची बेरीज सध्या उमेदवार करत आहेत. महिन्याभरापासून कामाला लागलेल्या उमेदवारांना मतदानानंतरही १५ डिसेंबर रोजी रात्री निकालाच्या उत्सुकतेने शांत झोप लागली नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशांचे पालन करण्यातही या उमेदवारांची मोठी दमछाक झाली. नियमाचे पालन करत असताना निवडणूक प्रचारात कुठे कमी पडायला नको, म्हणून उमेदवारांनी दिवस-रात्र एक केली. आता प्रत्यक्ष आपल्या गावात मतदारांनी कोणाला कौल दिला, याची उत्कंठा उमेदवारांना आहे.
गावांचे कारभारी कोण होणार?
ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय मिळवून सरपंचपद मिळणे म्हणजे त्या गावातील प्रतिष्ठेचे स्थान समजल्या जतो. परंतु आता निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार? आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांनी ग्रामपंचायत सदस्यांचेच स्वप्न रंगविलेले आहे. गावांचे कारभारी कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती
बुलडाणा जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींमध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या. बुलडाणा शहराला लागून असलेल्या सागवण ग्रामंपचायतमध्येही निवडणुकीची चांगलीच चुरस लागली होती. देऊळघाट, डोणगाव, साखरखेर्डा यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतींमध्येही निवडणूक चुरशीची ठरली. यामध्ये काही उमेदवार सख्ये नातेवाईकच एकमेकांविरोधात रिंगणात उभे होते.
निकालानंतर बंदोबस्त वाढविण्याची गरज
जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट आणि मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे हाणामारी झाल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे या दोन्ही गावांव्यतिरिक्त इतर ठिकाणीही निकालानंतर पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे.
निवडणुकीचे चित्र
ग्रामपंचायत संख्या ४९८
उमेदवार ९२२९
मतदान केंद्र १८०३
झालेले मतदान ७ लाख ५० हजार ९२९