सोनाळा : संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात २६ जनावरे दगावली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खामगाव, शेगाव नंतर आता संग्रामपूर तालुक्यातील जनावरे मृत्युमूखी पडत असल्याने पशुपालक भयभित झाले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडत असल्यामुळे अनेकांनी हिरवे गवतही जनावरांना टाकणे बंद केले आहे. काहींनी माळरानावर जनावरे चरावयास पाठविणे बंद केल्याचे चित्र आहे. स्थानिक आठवडी बाजारालगत शनीमंदिराजवळ राहत असलेल्या फकीरचंद विश्वकर्मा यांच्या गोठय़ातील दोन म्हशी, दोन वासरे आणि म्हशीचे बछडे अशी पाच जनावरे मळ्यातील हिरवा चारा खाल्यामुळे रविवारी सायंकाळी दगावली. गोठय़ातील इतर जनावरांनाही बाधा पोहोचू नये, यासाठी गजानन विश्वकर्मा यांनी रविवारी रात्री रौंदळा येथील खासगी डॉक्टरकडून उर्वरीत ११ जनावरांवर उपचार केले. ही जनावरे अत्यवस्थ असल्यामुळे विश्वकर्मा भयभीत झाले आहे. त्याचप्रमाणे सोमवारी काठेवाडी भोराभाई नामक पशुधन मालकाच्या १८ गायी सातपुड्यात चरावयास गेल्या होत्या. या १८ गायी जगंलातच दगावल्याने काठेवाडी भोराभाई कमालिचे हतबल झाले आहेत. याशिवाय टुनकी येथेही तीन जनावरे दगावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, फकीरचंद विश्वकर्मा यांच्या पाच जनावरांचे शवविच्छेदन पशुधन अधिकारी पुंडेकर व एस.टी. कोकाटे यांनी केले.
सोनाळा परिसरात २६ जनावरे दगावली
By admin | Updated: July 30, 2014 00:03 IST