मोताळा : तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील तब्बल ३७२ महिलांनी सरकारी जागेवर असलेल्या देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी ग्रामसभेत १२ ऑगस्ट रोजी स्वाक्षर्या करून पहिली लढाई जिंकली आहे. पिंपळगाव देवी येथे मागील चाळीस वर्षापासून शासनाच्या जागेवर देशी दारूचे दुकान सुरू आहे. या दुकानाच्या जवळच पुरातन प्रसिद्ध जगदंबा मातेचे मंदिर, मराठी शाळा व आरोग्य केंद्र आहे. या दारू दुकानाजवळून ये-जा करणार्या महिलांना दारू पिणार्यांचा मनस्ताप सहन करावा लागत असून, या दारूमुळे गावातील अनेकांचा मद्य प्राशनाच्या व्यसनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक महिलांचे संसार उद्धवस्त झाले आहे. या त्रासाला कंटाळून दुकान बंद व्हावे यासाठी गावातील शेकडो महिलांनी पुढाकार घेत अनेक वेळा निवेदने व तक्रारी दिल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सामाजीक कार्यकर्त्या प्रेमलता सोनोने यांच्या मार्गदर्शनात येथील महिलांनी कायदय़ाच्या चौकटीत राहून हे दुकान सनदशीर मार्गाने बंद करण्यासाठी पुढाकार घेतला . काही दिवसांपूर्वी या महिलांनी दुकानासमोरच आंदोलन करून प्रशासनाला घाम फोडला होता. आ. विजयराज शिंदे यांनीही यावेळी महिलांना दुकान हटविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काहीही निष्पन्न झाले नव्हते.हे देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी आता येथील महिलांनी पहिली पायरी यशस्वीरीत्या पुर्ण केली आहे. मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तब्बल ३७२ महिलांनी हे दारूचे दुकान बंद करण्याच्या बाजूनी स्वाक्षर्या करून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ग्रामसभेला प्रेमलता सोनोने, जि. प. सदस्या मालतीताई वाघ, गटविकास अधिकारी एम.आर. नाईक, सरपंच जवरे, ठाणेदार सेवानंद वानखडे, विस्तार अधिकारी संदीप दळवी, ग्रामसेवक शेवाळे यांच्यासह शेकडो महिला व नागरीक उपस्थित होते. दारूचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी ग्रामसभेत उपस्थित राहून उत्स्फुर्तपणे भाग घेण्याची हि पहिलीच वेळ आहे.
दारू दुकानाविरोधात एकवटली नारीशक्ती
By admin | Updated: August 13, 2014 23:41 IST