खामगाव (जि. बुलडाणा) : होळीच्या निमित्ताने शहरात मोठय़ा प्रमाणावर भांग विक्रीस आली असून, खुलेआमपणे शहरातील मुख्य रस्त्यावर या भांगेची विक्री केली जात असल्याची बाब ह्यलोकमतह्ण स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली आहे. खामगाव शहरातील भररस्त्यावर फरशी भागात तसेच भाजीबाजार, सराफा या भागात चलतीफिरती विक्री करण्यात येत आहे. स्वस्तात नशा होत असल्याने अनेक जण या व्यसनाकडे वळत आहेत. अनेकांना याचे व्यसन जडल्याने याचे चूर्ण असलेली पुडी खिशात ठेवण्यात येत आहे. एकदा सवय लागली की, या व्यसनापासून दूर जाणे अशक्य होते. त्यामुळे असे व्यसन करणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यानिमित्ताने लोकमतच्या चमूने शहरात स्टिंग ऑपरेशन केले, यावेळी भांग विक्रेत्याच्या परिचयातील व्यक्तीस सोबत घेऊन गेले असता अगदी सहजपणे भांगेच्या पुड्या मिळाल्या. नवीन ग्राहक म्हणून यापुढे लागली तर सकाळी ९ ते ३, संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत येवून भेटावे, अशी सूचनासुद्धा अवैध विक्रेत्याकडून देण्यात आली.
*चूर्ण कोठेही उपलब्ध
भांगेचे चूर्ण शहरात कोठेही उपलब्ध आहे; मात्र हे चूर्ण विकत घेण्यासाठी ग्राहकाला अनेक चाचण्यांना सामोरे जावे लागते. खात्री पटल्यानंतरच विक्रेता संबंधित ग्राहकाला चुर्णाची पुडी दिल्या जाते.
*जडीबुटी नावाचा आहे कोडवर्ड
शहरात येणारी भांग ही मध्यप्रदेशातून आणली जाते. त्यानंतर या भांगेची चूर्ण व गोळी अशा स्वरुपात विक्री करण्यात येते. भांग मागण्यासाठी विशिष्ट शब्दाचा ह्यहरे हरेह्ण म्हणून वापर करण्यात येतो. नेहमीच्या परिचित व्यक्तीलाच भांगेची विक्री होते. यासाठी ह्यसियारामह्ण म्हणून ओळख द्यावी लागते. काही ठिकाणी केवळ हरे हरे आणि सियाराम म्हटल्यास सहजासहजी भांग मिळत नाही. तर हरेहरे आणि सियाराम या शब्दाला जडीबुटी या शब्दाचीही जोड द्यावी लागते. त्यानंतरच कुणालाही भांग मिळण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे दिसून येते. जडीबुटी विक्रीचे विशिष्ट ठिकाण नसून, काही विक्रेते खिशात वागवून हवी तशी ग्राहकांना रस्त्यावर उपलब्ध करून देतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करणे शक्य होत नसल्याचे दिसून येते.