जळगाव जामोद : दैनंदिन सामाजिक जीवन सुरळीत व नियमाला अनुसरून चालावे म्हणून पोलीस विभाग अहोरात्र आपली सेवा देत असतो. कुटुंबातील अनेक उत्सवांना अनुपस्थित राहून दिलेले कर्तव्य पोलीस चोख बजावतात म्हणूनच इतर सर्वजण सुखाची झोप घेवू शकतात. हिच त्यांची सेवा विचारात घेवून लोकमत सखी मंच युनिट जळगाव जामोदच्या वतीने राखी पौर्णिमेच्या पर्वावर पोलीस स्टेशनमध्ये जावून पोलीस दादांना राखी बांधल्या त्यामुळे पोलीस वर्ग अक्षरश: भारावून गेला होता. महिला वर्गाचे रक्षण येत्या वर्षभरात पोलीस विभागाकडून अत्यंत काटेकोर व्हावे असाच भाव या सखींचा राखी बांधतांना होता. यावेळी ठाणेदार मधुकरराव भोगे यांनी सखी मंचच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि महिला वर्गाचे संरक्षण अग्रक्रमाने केले जाईल, असे सांगितले. यावेळी सौ.वंदना कांडलकर, डॉ.सौ.अपर्णा कुटे, सौ.सविता देशमुख, प्रा.सौ. स्मिता पवार, सौ.चित्रलेखा राजवैद्य, सौ.निता सातव, सौ.उर्मिला पलन, सौ.परविन देशमुख, सौ.विद्या घुटे, सौ.वैशाली वाकडे, व सौ.संध्या गायगोळ या सखी मंच सदस्यांनी पोलीस बंधुंना ओवाळून पेढा भरवून व गुलाबपुष्प देवून राखी बांधल्या. रक्षाबंधनासारख्या सणालाही आम्ही आमच्या बहिणींकडे आराखी बांधून घेण्यासाठी जावू शकत नाही ही खंत सखी मंच सदस्यांनी आमच्या मनातून दूर घालविली एक नव्हे तर अनेक भगिनी आज आम्हाला मिळाल्या असे मत पोलीस बांधवांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.वंदना कांडलकर यांनी केले तर डॉ.सौ.अपर्णा कुटे यांनी सखी मंचच्या वाटचालीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ.चित्रलेखा राजवैद्य यांनी केले.
रक्षाबंधनाने पोलिस अधिकारी व कर्मचारी भारावले
By admin | Updated: August 13, 2014 00:12 IST