खामगाव : एक्का बादशहा नावाचा जुगार खेळणार्या पाच जणांना पकडून त्यांच्याजवळून सुमारे १५ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना शनिवारी दुपारी ४.३0 वाजताचे सुमारास टिळक मैदान परिसरात घडली. स्थानिक टिळक मैदान परिसरात सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हारजीतवर एक्का बादशाह नावाचा जुगार खेळल्या जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके व उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर यांच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे शनिवारी दुपारच्या सुमारास जुगारावर छापा मारला असता पवन संतोष राठी (वय २२) रा.वामन नगर, गजानन नामदेव दांदळे (वय ५५), श्रीहरी नरहरी टिकार (वय २९) रा.कोलोरी, संदीप दयाराम पटोकार (वय ३९) रा.पिंप्राळा यांच्याजवळून १३ हजार ९३0 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. तर संदीप शिवाजी हिवाळे रा.पिंप्राळा हा पळून गेला. त्याच्या हातातील १३५0 रूपये मिळून आले. असा एकुण १५ हजार २८0 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उपरोक्त आरोपींविरूध्द शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम १२ अ मुजुकाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, सुधाकर थोरात, सुनील बैनाडे, विशाल कोळी, मनिष कवळकार, देविदास सोनाळकर, गुलाबराव काळे, गजानन बोरसे, संदीप टाकसाळ, गणेश शेळके यांनी केली आहे.
जुगार अड्डय़ावर छापा; १५ हजाराचा मुद्देमाल जप्त
By admin | Updated: December 6, 2015 02:31 IST