बुलडाणा : शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका पाठ सोडायला तयार नाही. अतिपावसाने शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, पीक विमा योजनेच्या हक्काच्या लाभापासून शेतकरी वंचित आहेत. ऑनलाईन तक्रार करू न शकलेल्या बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी बांधवांनासुध्दा पीक विमा योजनेच्या अंतर्गत मोबदला रक्कम मिळावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव याांनी केली.
दिल्ली येथे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १० फेब्रुवारी रोजी लोकसभेत खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. नियम ३७७ अन्वये पीक विम्याची मागणी लावून धरत शेतकऱ्यांच्या हक्काच्या मोबदल्याबाबत सरकारचे लक्ष वेधले. खासदार प्रतापराव जाधव यांनी पीक विम्याचा मुद्दा मांडत राज्य आणि खासकरुन बुलडाणा जिल्ह्यात गत काही काळात अनेक ठिकाणी पावसाने शेतकऱ्याांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यात शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक नष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे अतिपावसामध्ये प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार दाखल केल्यावर मोबदला मिळाला. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागात इंटरनेट आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता या असुविधेमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ऑनलाईन स्वरुपात विमा कंपनीकडे तक्रार दाखल करू शकलेले नाहीत. या कारणांमुळे गरीब शेतकरी बांधवांना हक्काचा मोबदला न मिळाल्याने संकट ओढवले आहे. बुलडाणा जिल्ह्यात पीक कापणीनंतर अनेक वेळा अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. पावसाने खराब झालेला शेतमाल मिळेल त्या भावामध्ये शेतकऱ्यांना विक्री करावा लागला. या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असतानाही त्यांना विम्याचा लाभ मिळू शकला नाही.
पीक विमा कंपनीच्या जाचक अटीमुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. अनेक शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यानंतर ऑनलाईन तक्रार करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकला नाही. अशा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, ऑनलाईन तक्रार करू न शकलेल्या शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेच्या अंतर्गत मोबदला रक्कम मिळावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली आहे.