मेहकरः मेहकर तालुक्यात ग्राम पंचायत निवडणूक २०२१ मध्ये ४१ गावांची निवडणूक जाहीर झाली हाेती. दाेन ग्रामपंचायती अविराेध झाल्याने आता ३९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, पथके रवाना झाली आहेत.
मेहकर तालुक्यातील ५३ सदस्य अविराेध झाले असून, इतर ३९ गावांतील ३१३ जागांसाठी ७४९ उमेदवार रिंगणात आहेत. तर या निवडणुकीसाठी निवडणूक विभागसुद्धा सज्ज असून, निवडणूक विभागाने आपली तयारी पूर्ण केलेली आहे. मोहना बु. व लावणा या दोन ग्राम पंचायतसोबत इतर गावातील काही सदस्य असे ५३ अविरोध निवडून आले. ३९ गावातील ३१३ सदस्यांसाठी ७४९ उमेदवार रिंगणात असून, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १४२ पोलिंग पार्ट्या आहेत. या पोलिंग पार्ट्यांना कर्तव्यावर पोचवण्यासाठी १८ बसेस व ज्या दुर्गम भागात बस पोचू शकत नाही, अश्या ठिकाणी पोलिंग पार्ट्यांना पोचवण्यासाठी ४ चारचाकी लहान वाहने राहतील. एका पोलिंग पार्टीत मतदान कर्मचारी ४, एक पोलीस शिपाई, १ कोतवाल किंवा शिपाई, मुस्लीमबहुल ठिकाणी ओळख पटवण्यासाठी एक महिला कर्मचारी अशी पोलिंग पार्टी राहणार तर मतदाराला मतदार यादीतून नाव शोधून देणे मतदाराला मतदान केंद्राबद्दल माहिती देणे यासाठी १४२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ हजर राहणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णायक अधिकारी राहणार असून, भरारी पथक, पोलीस विभाग असे सर्व विभाग निवडणुकीसाठी सज्ज राहणार आहेत, तर निवडणूक विभागाने याची पूर्ण तयारी केलेली आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मेहकर तालुक्यातील ७४९ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.