बुलडाणा : जिल्ह्यात एकूण ऑक्सिजनचे मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे. जिल्ह्यासाठी मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा अकोला व जालना येथून निरंतर सुरु ठेवण्यात आला आहे. हा पुरवठा अखंडितपणे सुरु राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी आरोग्य विभागाच्या समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती व रिफिलींग उद्योगासाठी पुढे यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचे एकही उत्पादन व रिफिलर नाहीत. जिल्ह्यात खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये आवश्यक असणारा मेडिकल ऑक्सिजन हा बाहेरील जिल्ह्यांमधून मागविण्यात येत आहे. कोविड - १९ या विषाणूजन्य आजारात रुग्णाचे वाढते प्रमाण पाहता, भविष्यात मेडिकल ऑक्सिजनची जास्त गरज भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित वेळीही ऑक्सिजनची शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना गरज भासते. जिल्ह्यातील घाऊक औषध विक्रेता किंवा ज्यांना हा व्यवसाय करावयाचा आहे, त्यांनी पुढे यावे. ऑक्सिजन निर्मिती किंवा रिफिलींगचा उद्योग जिल्ह्यातच निर्माण करावा. त्यासाठी त्यांनी या कार्यालयातील सहाय्यक आयुक्त औषधी अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन प्रल्हाद घिरके यांच्याशी संपर्क साधावा. जेणेकरुन असे व्यावसायिक पुढे आल्यास ऑक्सिजन उत्पादन, रिफिलींग तसेच घाऊक व्यवसाय करणाऱ्यांना कार्यालयातील अधिकारी परवाना मिळण्यासाठी त्वरित मदत करतील. अशा उद्योगांना परवाना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग तत्पर आहे. जिल्ह्यातील जागरुक नागरिकांनी रुग्णहिताच्या दृष्टीकोनातून समोर येवून सामाजिक हित जोपासावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (औषध) अन्न व औषधे प्रशासन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.