बुलडाणा: देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा,
उघड दार देवा आता, उघड दार देवा...!
हे भक्तीगीत न ऐकलेला एकही भाविक सापडणार नाही. परंतु आज हेच भक्तीगीत भाविकांना म्हणण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने श्रावणातही भक्तांना कळसाचेच दर्शन घ्यावे लागत आहे. निर्बंध शिथिल झाल्याने दुकान, सार्वजनिक कार्यक्रम सर्व काही सुरळीत सुरू आहे. परंतु मंदिर उघडण्याला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे देऊळ बंद आणखी किती दिवस, असा प्रश्न विविध मंदिरांचे अध्यक्ष व भक्तगणांमधून उपस्थित होत आहे.
भाविकांच्या मनाची कुचंबणा थांबेल
रोग बरा होण्यासाठी शरीराच्या प्रतिसादासोबत मनाचा प्रतिसादही गरजेचा असतो. कोरोनासारख्या जागतिक रोगाशी प्रतिकार करताना शासनाला अनेक व्यवहार थांबवावे लागले. ते योग्यच आहे. मात्र जशी व्यापारी प्रतिष्ठाने खुली केली, तशी मंदिरे उघडायला हवीत. मंदिरे उघडल्यास भाविकांच्या मनाची होणारी कुचंबणा थांबेल. भक्तिकेंद्रित ऊर्जेतून निर्माण होणारी धर्मश्रद्धा मनोबल उंचावण्याचे काम करते. त्यामुळे आवश्यक ती बंधने घालावीत, पण मंदिरे उघडावीत.
- गोपाल महाराज पितळे, राज्य कार्यकारी सदस्य, वारकरी महामंडळ.
भाविक दर्शनासाठी विनंती करतात
मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकारने भाविकांच्या भावनांचा विचार करुन मास्क लावून, सोशल डिस्टन्सिंग ठेवत मंदिरे उघडावीत. श्रावण मास चालू आहे. अनेक भाविक आमच्याकडे दर्शनासाठी विनंती करतात. म्हणून शासनाने मंदिरे उघडल्यास भक्तगण समाधानी राहतील.
-नवलकिशोर बंग, विश्वस्त, श्री मारुती संस्थान, मेहकर.
भाविकांना मंदिर उघडण्याची प्रतीक्षा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून मंदिर बंद आहे. तरीसुद्धा भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनच परत जातात. भाविकांना सध्या मंदिर उघडण्याची प्रतीक्षा आहे.
परशुराम गुरव, पुजारी मर्दडी देवी संस्थान दुधा.
भक्तांना श्रावणात दर्शनाची ओढ
श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. परंतू यंदा मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. श्रावण महिन्यात दरवर्षी महिनाभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. कोरोनामुळे यावर निर्बंध आले आहेत. भक्तांना दर्शनाची ओढ लागलेली आहे.
संदीप नागरिक.
अध्यक्ष, महादेव मंदिर संस्थान, शिवचंद्र मोळी.
मंदिरा समोरील व्यावसायिकांवर उपासमारी
जिल्ह्यात प्रत्येक शहरात मोठे मंदिर आहे. त्या मंदिरासमोर फुल, हार, नारळ, हळद, कुंकू यासह पूजेचे विविध साहित्य विक्रेते बसतात. या व्यावसायिकांचे कुटुंबच त्यावर चालते. परंतु मंदिर बंद असल्याकारणाने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. श्रावण महिन्यात मोठी उलाढाल होत असते, परंतू यंदा मंदिर बंद असल्याने श्रावणातही अडचणीचे दिवस आल्याचे मत व्यावसायिकांनी लोकमतकडे व्यक्त केले.