मोताळा : तालुक्यातील नळगंगा प्रकल्प परिसरातील दुध महाळ शिवारात शेतकर्यांच्या ईलेक्ट्रीक मोटारीचे केबल चोरतांना गावकर्यांनी सहा चोरट्यांना रंगेहाथ पकडल्याची घटना ४ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. भगवान उखा इंगळे रा. काबरखेड यांनी बोराखेडी पोलिस ठाण्य़ात तक्रार दिली आहे की ४ जुलै रोजी दुध महाळ शिवारात असलेल्या मोटारीचे कनेक्शन बंद करण्यासाठी गेलो असता काही जण मोटारीचे केबल चोरत असतांनाचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. रात्रीची वेळ व चोरट्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून गावकर्यांना बोलावून घेतले. केबल चोरत असतांना मलकापूर येथील ताजनगर पारपेट भागात राहणारे शे.नईम शे.रफीक, गफ्फार खाँ जब्बार खाँ, तौफिकखाँ गुलाबखाँ, ईक्बालखाँ जब्बारखाँ, कलीमखाँ असलमखाँ व शे. ईसाक शे.ईस्माईल या सहा चोरट्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी सहाही आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून बारा हजार पाचशे रूपये किमतीची १३५ फुट केबल, ३ हजार २00 रूपये नगदी, ७५ हजार रूपये किमतीच्या दोन मोटारसायकली, १४ हजार रूपये किमतीचे मोबाईल असा एकूण १ लाख ४ हजार ८२0 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. भगवान इंगळे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी सहा आरोपींविरूद्ध कलम ३७९, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरातूनच लाखो रूपयांची केबल चोरट्यांनी लंपास केली होती. या आरोपींचा त्यामध्ये सहभाग तर नसावा अशी शक्यता वर्तविल्या जात आहे.
मोटारपंप केबल चोरांना रंगेहाथ पकडले
By admin | Updated: July 5, 2014 23:49 IST