मोताळा: तालुक्यातील तरोडा येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेवरील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या जागी ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे शिक्षकांच्या नियुक्ती बाबत प्रशासनस्तरावरून कुठलीच कारवाई होत नाही. या उदासिनतेमुळे संतप्त पालक व शाळा व्यवस्थापन समितीने ४ ऑगस्ट रोजी शाळेला कुलूप ठोकले आहे. तरोडा येथील शाळेची पट संख्या ५३३ असून वर्गा पहली ते सातवीच्या प्रत्येकी दोन तुकड्यांसाठी १४ शिक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक तुकड्यांमध्ये ३५ ते ४0 विद्यार्थी संख्या आहे. परंतु मागील वर्षीच्या ३0 सप्टेंबरच्या पट संख्येनुसार प्रशासनाने या शाळेवरील दोन शिक्षकांना अतिरिक्त ठरवीले व त्यांना कोथळी केंद्रामध्ये इतरत्र अतिरिक्त प्रभार दिला.यावर्षीची पट संख्या पाहता शिक्षकांची संख्या अपूरी पडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन शिक्षकांची मागणी केली होती व शिक्षकांची मागणी पूर्ण न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र या मागणीची दखल घेतली नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेला कुलूप ठोकले व जो पर्यंत शिक्षक मिळत नाही, तो पर्यंत शाळा बंदचा इशारा दिला. या आंदोलनाची माहिती होताच केंद्र प्रमुख हिरासिंग धिरबस्सी यांनी तरोडा येथे धाव घेत ८ ऑगस्टपर्यंत शिक्षकांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
शाळेला ठोकले कुलूप
By admin | Updated: August 4, 2014 23:39 IST