सिंदखेडराजा : तालुक्यातील २९ गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश असून, साखरखेर्डा येथील गायखेडी तलावातील गाळ काढण्यापासून या योजनेस प्रारंभ झाला. गेल्या तीन दिवसांत ३५ हजार बरास गाळ काढण्यात आला आहे.दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई, वातावरणातील बदल हे पाहता जलयुक्त शिवार योजना राबविण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे जमिनीची धूप थांबून जलसाठा वाढवण्यास मदत होईल, असे प्रशासनाचे मत आहे. शेतकर्यांनी शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी तलावातील गाळ शेतात टाकावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनी उपविभागीय अधिकारी सचिन कल्हाळ, तहसीलदार संतोष कणसे यांनी गायखेडी तलाव येथे जाऊन कामाची पाहणी केली. जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून पाणंद रस्ते, नाला खोलीकरण, तलावातील गाळ काढणे ही मोहीम लोकसहभागातून हाती घेतली. तिचे महत्त्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांना मार्गदर्शन केले आणि त्यानुसार प्रत्येक गावपातळीवर कृषी अधिकारी, कृषी साहाय्यक, तलाठी यांनी जलयुक्त शिवार योजनेची माहिती शेतकर्यांना दिली. गायखेडी तलावातून हरिभाऊ जैवळ, डॉ.जावेद आलम तसेच गोविंद रामानंद प्रल्हाद महाराज संस्थान आदींनी या योजनेला सहकार्य करुन गाळ काढण्याला मदत केली.
जलयुक्त शिवार योजनेत २९ गावांचा समावेश
By admin | Updated: May 5, 2015 00:10 IST