लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सृष्टी बहुद्देशीय संस्था अकोला व तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे आयोजीत तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन पार पडले. येथील कोल्हटकर स्मारक सभागृहात साहित्य संमेलन पार पडत आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध नाट्यकर्मी व लेखक राजकुमार तांगडे यांच्याहस्ते झाले. संमेलानाध्यक्ष म्हणून युवा साहित्यीक नवनाथ गोरे तर स्वागताध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण यांची उपस्थिती लाभली आहे. खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर, माजी संमेलनाध्यक्ष किशोर बळी, नगराध्यक्षा अनिता डवरे, डॉ. बी. जी. शेखर, प्रा.वंदना दीपक मोरे, प्रा. गजानन भारसाकळे, पत्रकार राजेश राजोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. सकाळी ८ वाजता शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये सहभागी वेगवेगळ््या वेशभुषेतील चिमुकल्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते. साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात जागर शब्दसृष्टीचा स्मरणिकेचे प्रकाशन आणि सूत्रसंचालनाची सूत्रे ई_पुस्तकाचं प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यभरातील शंभरच्यावर साहित्यिक वेगवेगळ्या साहित्यिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित झाले आहेत. राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रसिकांना साहित्याची चांगलीच मेजवानी मिळाली आहे. साहित्य संमेलनाला खामगाव शहर व परिसरातील युवक-युवती, शाळा महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, खामगाव शहर व परिसरातील साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. तरुणाई फाऊंडेशनचे कार्यकर्ते संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.
खामगावात युवा मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 14:10 IST