सिंदखेड राजा : जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजा नगरीतील स्मारकांना राष्ट्रीय स्मारकांचा दर्जा दिला जावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी केली आहे. यासंदर्भात काझी यांनी खा. सुप्रिया सुळे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत शहरातील ऐतिहासिक स्मारकांच्या छायाचित्रांसह दस्तऐवज त्यांनी सुळे यांना दाखविले. त्या लवकरच शहरात येऊन पाहणी करणार असल्याचे काझी म्हणाले.
शनिवारी सिंदखेड राजा येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. नाझेर काझी, नरेश शेळके यांनी सुप्रिया सुळे यांची मुंबई ९ सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. त्यात १९८१ मध्ये तत्कालीन म़ुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी तत्कालीन खा. बाळकृष्ण वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेड राजा विकासासंदर्भात समिती स्थापन केली होती. या समितीने जो अहवाल सरकार दरबारी दिला होता त्यात त्यावेळी १०० कोटींच्या विकास आराखड्याचा उल्लेख आहे. देशातील अव्दितीय समाधीस्थळांपैकी राजे लखुजीराव जाधव यांची समाधी उल्लेखित केली गेली आहे. १०० कोटींच्या निधीमधून राष्ट्रीय स्मारकांचे संवर्धन व सौर्दयीकरण शहराचा विविध अंगी विकास, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते, असे ते म्हणाले. शहरातील १३ ऐतिहासिक स्मारकांच्या जतन व संवर्धनाच्या संदर्भात राज्य व केंद्रीय पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधून योग्य तो मार्ग काढण्याबाबत खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांना आश्वासित केले आहे. पत्रकार परिषदेस विजय तायडे, शिवाजी राजे जाधव, राजेंद्र अंभोरे, संभाजी पेटकर, जगन सहाने, ॲड. संदीप मेहेत्रे, यासीन शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
--मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा व्हावी--
१२ जानेवारीच्या जिजाऊ जन्मोत्सवाला राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जिजाऊंची महापूजा व्हावी. त्याचबरोबर १२ जानेवारी ही शासकीय सुट्टी घोषित करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, जालना-खामगाव-शेगाव हा रेल्वेमार्ग मार्गी लागावा, यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे स्वत: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ३०० कोटींच्या शहर विकास आराखड्याची चर्चा झाली. सदर अहवालात २५० कोटी रुपये केवळ शहराच्या पुनर्वसनासाठी खर्च केेले जाणार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हा अहवाल समाधानकारक नसल्याचे काझी म्हणाले. शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात वनविभागाचे २९८ हेक्टर विस्तीर्ण जंगल इको टुरिझमसाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.