मेहकर (जि. बुलडाणा): बँकेचे कर्ज प्रकरण मंजूर होऊनही सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक कर्ज देण्यास विलंब करीत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकरी युवकाने २२ डिसेंबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयातील मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाईल अभिनव आंदोलन केले. देऊळगाव माळी येथील शेतकरी पवन सुरेश गाभणे यांनी शेतीला जोडव्यवसाय करण्याकरिता सेंट्रल बँक ऑफ इंडिया मेहकर शाखेमध्ये दोन वर्षांपासून कर्ज प्रकरण सादर करून दूध विक्रीसाठी पाच लाख रुपयांची कर्ज मागणी केली होती. बँक व्यवस्थापकाने एकूण ४ लाख रुपये कर्ज मंजूर केले होते. कर्ज प्रकरण मंजूर होऊनही व्यवस्थापक रक्कम देत नसल्याने सदर युवक शेतकर्याने नागपूरच्या अधिवेशनात सायकलवरुन यात्रा करून संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली होती. तरीही कर्ज रक्कम मिळत नसल्यामुळे पवन गाभणे यांनी २२ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या परिसरातील मोबाइल टॉवरवर जाऊन शोले स्टाईल अभिनव आंदोलन केल्याने पोलीस यंत्रणा जागी झाली; मात्र बँक अधिकारी भेट देण्यासाठीही आले नाही. शेवटी बँक व्यवस्थापकासोबत झालेल्या चर्चेदरम्यान प्रथम हप्ता देत असल्याचे बँक मॅनेजरने सांगितल्याने सदर शेतकर्याने आंदोलन मागे घेतले. २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजतापासून हे आंदोलन पाहण्यासाठी तहसील कार्यालय परिसरात एकच गर्दी जमली होती.
शेतक-याचे ‘शोले’ स्टाइल आंदोलन!
By admin | Updated: December 23, 2015 02:19 IST