बुलडाणा : विजेचा दाब वाढल्याने इलेक्ट्रीक उपकरणे बंद पडल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची घटना येथील चंद्रमणी नगरात २८ जुलै रोजी संध्याकाळी घडली. याप्रकरणी सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बुलडाणा शहरातील मलकापूर रस्त्यावर असलेल्या चंद्रमणी नगरात २८ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता अचानक वीज गेली. दरम्यान, विजेचा दाब वाढल्याने चंद्रमणी नगरातील अनेक घरात शॉर्ट सक्रिट झाले. त्यात ओंकार निनाजी सुरडकर यांचा रंगीत टी.व्ही. व मोबाईल, सुशिलाबाई उदयभान डोंगरे यांचा टी.व्ही. व मोबाईल, आशाबाई भाऊराव दाभाडे यांचा टी.व्ही. व मोबाईल, मंगलाबाई सिद्धार्थ डोंगरे यांचा मोबाईल व ट्युब लाईट, चंद्रभागाबाई गोविंदा जाधव यांचा टी.व्ही.व मोबाईल, सुभाष जयराम सरदार यांचा टी.व्ही व घरातील इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. शहरासह ग्रामीण भागात सध्या भारनियमन सुरु आहे. त्यामुळे वेळीअवेळी वीज गुल असते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना ग्रामीण भागातही घडल्या आहेत. या घटनेची वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. घटनास्थळाला वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली.
विजेचा दाब वाढल्याने उपकरणे जळाली
By admin | Updated: July 29, 2014 23:31 IST