वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे जंतदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जंतदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे जंतदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. बालकांमध्ये आढळणाऱ्या जंतदोषाचे गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. त्याच अनुषंगाने आरोग्य विभागाकडून २१ सप्टेंबरपासून राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
काय आहे जंतदोष?
जंतदोष म्हणजे दूषित मातीच्या संपर्कात आल्याने शरीरात जंताचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे शरीरातील रक्त कमी होणे,अशक्तपणा येमे, कुपोषण वाढणे आदी आजार जडतात.
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा मूळ उद्देश १ ते ६ वयोगटांतील सर्व मुले व ६ ते १९ वर्ष वयोगटांतील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देणे हा आहे. यासोबतच आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांच्याकडे संपर्क साधल्यास गोळ्या मिळू शकतात.
वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
१ ते ६ वयोगटांतील सर्व मुले व ६ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना हा आजार होऊ शकतो. म्हणून हा आजार संपुष्टात आणण्यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना या गोळ्या वाटप केल्या जातात.
जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून २१ सप्टेंबरपासून सर्वत्र या जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. या मोहिमेत एकही मूल वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
-डॉ. रवींद्र गोफणे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, बुलडाणा