बुलडाणा : गत दीड वर्षात कोरोनाने पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना गाठले. कोरोनावर मात केली असली तरी कोरोना आजार होऊन गेल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांनी इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी कराव्यात, यासंदर्भात रुग्णांमध्ये गैरसमज आहेत. त्यामुळे योग्य वेळी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी शस्त्रक्रिया केल्यास पुढील संकट टाळता येणे सहज शक्य आहे.
काही शस्त्रक्रिया अत्यंत तातडीने करायच्या असतात. त्या शस्त्रक्रिया तातडीने केल्या नाही तर रुग्णांच्या जिवाला धोका होऊ शकतो. यामध्ये रुग्णाला कोरोना असेल किंवा होऊन गेला असेल तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. यामध्ये हृदयरोग, मेंदुविकार, कॅन्सर, अपघात, किडनी आदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. प्लान सर्जरी या शस्त्रक्रियेमध्ये ठरवून आपल्या सोयीनुसार शस्त्रक्रिया केली जाते.
यामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी आपली प्रकृती स्थिर झाल्यानंतर डॉक्टर तसेच रुग्णांच्या सोयीनुसार शस्त्रक्रिया केली जाते. कोरोना झालेल्या रुग्णांना इतर आजारांसाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास अत्यंत काळजी घ्यावी लागते. कोरोना रुग्णांना खोकला, सर्दी असते. अशावेळी इतरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व सोयींनीयुक्त रुग्णालय असणे आवश्यक आहे.
ही घ्या काळजी
कोरोना झाला नाही असेही काही रुग्ण सध्या कोरोनामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी घाबरतात. मात्र, रुग्णांनी न घाबरता शस्त्रक्रिया करून घ्यावी. गरज असताना शस्त्रक्रिया न केल्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. डॉक्टरांकडून कोरोना चाचणीसोबतच छातीचा एक्स-रे, ईसीजी तसेच फिजिशियनचे फिटनेस प्रमाणपत्र घेऊन शस्त्रक्रिया करता येते. रुग्णालयात गर्दी करू नये, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास कमीत कमी लोकांनी भेटावे, जेवण, औषधी व व्यायाम, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे, कोरोनाचा फैलाव होणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी.
दीड महिन्याचा कालावधी आवश्यक
रुग्णांनी इतर आजारांची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोरोना झाल्यानंतर दीड महिन्यांचा कालावधी होऊन गेलेला असावा. मात्र, अत्यावश्यक असल्यास त्यापूर्वीसुद्धा शस्त्रक्रिया करता येते. मधुमेह, बीपी, दमा आदी असल्यास त्यांना प्रथम नॉर्मल आणणे गरजेचे आहे.
त्यानंतर ८ ते १२ आठवड्यांनंतर शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर फुप्फुसाचे इन्फेक्शन तसेच खोकल्याचा त्रास उद्भवल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
अतिआवश्यक शस्त्रक्रिया काेराेनाची लागण झालेली असतानाही करता येतात. ज्या शस्त्रक्रिया पुढे ढकलता येऊ शकतात त्या काेराेनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर कराव्यात काेराेनानंतर शस्त्रक्रियेविषयी तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. काेराेनाच्या भीतीने दुखणे अंगावर काढू नये. साधारणत: काेराेनातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे, रुग्णांनी संभ्रम ठेवू नये.
-डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा