खामगाव (जि. बुलडाणा) : दिल्ली येथील निर्भया प्रकरणानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देशभरात ऐरणीवर आला असताना महिला व मुलींना आपल्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध नाव न सांगता दाद मागता यावी, यासाठी तत्कालीन ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी ५ वर्षांपूर्वीच खामगाव शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या लावून तक्रारी निवारणाचा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची आता शासनानेही दखल घेतली असून, राज्यभरातील सर्वच शाळा-महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या लावण्याचे ५ मे रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्देश दिले आहेत.राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेट्या बसविण्याची आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात येणार आहे. यामध्ये शाळांना शाळांमध्ये दर्शनी भागावर पुरेशा मापाची तक्रारपेटी सुरक्षित जागेवर लावावी लागणार आहे. आठवड्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ही तक्रारपेटी मुख्याध्यापक, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडावी लागणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पोलीस पाटील आहेत अशा ठिकाणी पोलीस पाटलांची सेवा घ्यावी लागणार आहे. यामध्ये गंभीर, संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारीबाबत पोलीस यंत्रणांचे सहाय्य उपलब्ध होणार आहे. तक्रारपेटीमध्ये प्राप्त होणार्या सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे. ज्या तक्रारी शाळा व्यवस्थापन, प्रशासन स्तरावर निकाली काढणे शक्य आहे त्याबाबत तत्काळ शाळा प्रशासन स्तरावर कार्यवाही करावी लागणार आहे. तर ज्या तक्रारींसंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर किंवा शासन स्तरावर कार्यवाही, मार्गदर्शन अपेक्षित असेल तेथे योग्य त्या स्तरावर तक्रारींच्या प्रतीसह संदर्भ करण्यात यावा. शाळेतील महिला शिक्षक, विद्यार्थिनी यांच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवाव्या लागणार आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींवरील अत्याचाराबाबतच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीसमोर ठेवाव्या लागणार आहेत. या समित्यांना अशा तक्रारी सर्वात प्रथम विचारात घेऊन त्याबाबत योग्य ते निर्देश द्यावे लागणार आहेत. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून, तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य दक्षता घेण्याचे निर्देशसुद्धा संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना!शाळांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत ही ठोस उपाययोजना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम खामगावसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ५ वर्षांपूर्वी तत्कालीन ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी सुरू केला होता. पोलीस प्रशासनामार्फत पत्रकार, मुख्याध्यापक आदींच्या उपस्थितीत दर आठवड्यात शहरातील शाळांसमोर लावलेल्या तक्रारपेट्या उघडून त्या तक्रारींची सत्यता पडताळून कार्यवाही करण्यात येत होती. नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून एका कुमारिकेने आत्महत्येचा विचारसुद्धा मनात आणला होता; मात्र नाव गुप्त राहून तिच्या तक्रारीचे निवारण झाल्याने या तक्रार पेट्यांची उपयोगिता वाढली होती.सर्वच शाळांमध्ये बसविणार तक्रारपेटी! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी जिलतील मोजक्याच शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र आता जिलतील १ हजार ४४८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ७७७ खाजगी शाळा, १0७ नगर परिषदेच्या शाळांसह माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याचे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने बंधनकारक केले आहे.यापूर्वी काहीच शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. आता सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविणे बंधनकारक झाले असून, नवीन शैक्षणिक सत्रातील शाळा सुरू होताच तक्रार पेट्या बसविण्यात येतील. - एन. के. देशमुख,प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा
राज्यभरात शाळांमध्ये लागणार तक्रारपेट्या!
By admin | Updated: May 8, 2017 02:20 IST