नांदुरा : पंचायत समिती अंतर्गत येणार्या खडदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक उच्च शाळेत या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ८ वी चा वर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांनी माळेगाव येथील शाळेतून पाल्यांचे दाखले काढून गावातील शाळेत दाखल केले. मात्र त्यानंतर तोंडी आदेशाने येथील शाळेत ८ व्या वर्गाला मंजुरात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. नांदुरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने खडदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र देवून इयत्ता ८ वीचा वर्ग उघडण्यासाठी मान्यता प्रदान करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यानुसार सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ८ वी चा वर्ग सुरू केल्याबाबतचे पत्र २७ मे रोजी शिक्षण विभागाला दिले होते. गावातच ८ वी चा वर्ग सुरू होत असल्यामुळे स्थानिक पालकांनी माळेगाव गोंड येथील बापुजी महाराज विद्यालयातून आपल्या पाल्यांचे दाखले काढून त्यांना गावातीलच या शाळेत इयत्ता ८ वी मध्ये दाखल केले. २६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सवाप्रसंगी या विद्यार्थ्यांचे स्वागत होवून रितसर आठवा वर्ग सुरू झाला. परंतु आता पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या शाळेला आठव्या वर्गाची मंजुरात न मिळाल्याने तो बंद करावा, असा तोंडी आदेश देत तगादा लावला. सदर प्रकार माहिती पडताच संतप्त पालकांनी पंचायत समिती शिक्षण विभाग गाठला. याठिकाणी गटशिक्षणाधिकारी हजर नसल्याने शिक्षण विस्तार अधिकारी तरमळे यांची भेट घेतली. यावेळी खडदगाव येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी खडदगाव व माळेगाव शाळेचे अंतर ३ कि.मी. पेक्षा कमी दाखविले असल्याने सदर वर्गास मंजुरात मिळाली नसल्याचे सांगितले.मात्र मंजुरात मिळालेली नसतांनाही या शाळेला आठवा वर्ग सुरू करण्याबाबत का कळविण्यात आले? असा प्रती प्रश्न पालकांनी तरमळे यांना करून कोंडीत पकडले. वास्तविक पाहता सदर शाळेचे अंतर माळेगाव शाळेपासून ३.३ कि.मी. असुनही माजी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांनी हे अंतर कमी दर्शविले आहे. यामुळे परवानगी नसल्याबाबतचे शिक्षण विभागाने शाळेला कळविले आहे. पालक व विद्यार्थ्यांचा दोष नसतांनाही शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजण्याची वेळ आली आहे. असे झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. पालकांसोबत यावेळी पंचायत समिती उपसभापती संतोष डिवरे व शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील उपस्थित होते.
मंजूर आठवा वर्ग तोंडी आदेशाने बंद
By admin | Updated: July 3, 2014 23:00 IST