देऊळगावराजा : पोलीस अधिकार्यांना वारंवार निवेदने देऊनही अवैध देशी दारुची विक्री सुरूच राहिल्याने अखेर ग्रामस्थांच्या पुढाकारानेच पोलीस कर्मचार्यांना घेऊन धाड टाकली असता देशी दारूच्या १३१ बाटल्या पकडण्यात आल्या. सदर घटना किनगांवराजा पो.स्टे. अंतर्गत उमरद येथे घडली. उमरद गावात अवैध देशी दारू विक्रीचे प्रमाण वाढल्याने भांडणे, किरकोळ वाद घडून व्यसनांच्या आहारी पुरुषांसह तरुणही जाऊ लागले. ग्रा.पं. सरपंच श्रीमती चंद्रकला मुळे, उपसरपंच सज्रेराव जाधव यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना लेखी पत्र दिले होते. स्थानिक पो.स्टे.चे अधिकारी कर्मचारीही सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने अवैध दारू विक्री करणार्यांना अभय मिळत होते. त्रस्त झालेल्या ग्रामस्थांच्या वतीने गजानन केकान, संतोष गिरी, बाबुराव जाधव यांचेसह पो.कॉ.बगेल, नंदू इंगळे, नायमने राठोड यांनी उमरद गावात धाड टाकून देशी दारूच्या १३१ बाटल्या जप्त करत आरोपी किसन भगवान जायभाये रा.उमरद यांचेविरुद्ध कारवाई केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारूविक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे. या अवैध दारूच्या आहारी तरूणवर्ग जात आहे. त्यामुळे अनेक कुटुंबात भांडण तंटे सुरू असतात. त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत असतो. शहर परिसरातही मोठय़ा प्रमाणात बोगस व अवैध दारू विक्री होत आहे. याकडे पालिस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
देशी दारूच्या १३१ बाटल्या जप्त
By admin | Updated: August 4, 2014 23:11 IST