मुखरू बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकरी आजही निसर्गाच्या संकेताचा अभ्यास परंपरागत पद्धतीने करताना पावसाचा अंदाज बांधतात. आधुनिक तंत्रज्ञानातही त्यांचे अंदाज तंतोतंत नाही पण जवळपास खरे ठरतात, हा आजवरचा अनुभव आहे. चैत्र नवरात्रीत नऊ दिवसात वातावरणात झालेल्या बदलांवरून पावसाचा अंदाज बांधला जातो. त्यावरून यंदा पावसाळा चांगला राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाळ्याच्या आरंभी व शेवटी पावसाचा जोर अधिक असण्याचे शुभ संकेत आहेत. कोरोना महामारीच्या काळात ही एक दिलासादायक बाब होय.
गतवर्षी पाऊस समाधानकारक बरसला. १०९ टक्के पावसाची जिल्ह्यात नोंद झाली. पावसावर शेतीचे सर्व गणित अवलंबून असते. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजासोबतच परंपरागत पद्धतीने काढण्यात येणाऱ्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. शेतकरी चैत्र नवरात्रीच्या पर्वात नऊ दिवसांचा अभ्यास करून पावसाचा अंदाज बांधतात. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात होणारा वातावरणातील बदल नोंदवून अंदाज बांधला जातो. काही शेतकरी पक्ष्यांच्या हालचालींवरूनही पावसाचा अंदाज बांधताना दिसतात. त्यात कावळा वाळलेली काडी कसा उचलतो. त्याने तोंडात पकडलेली काडी कोणत्या दिशेने अधिक व कोणत्या दिशेने कमी याचाही अभ्यास करून अंदाज घेतला जातो. पक्षी घरटे कुठे बांधतात, किती उंचीवर बांधतात, याचाही अभ्यास करून पावसाचा काळ ठरवला जातो.
गत वर्षभरापासून भारतीय हवामान खात्याचे अंदाज पावसाच्या दृष्टीने निश्चितच तंतोतंत खरे ठरताना दिसत आहेत. वर्षभरात भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाजपत्रक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलेले आहे. याला शास्त्रीय आधार असला, तरी भारतीय शेतकऱ्यांचे पारंपरिक असलेले अनुभवसुद्धा काहीअंशी प्रेरणादायी किंवा मार्गदर्शक ठरत आहेत. हिंदी महासागरातील हवामानाच्या बदलावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग निश्चित होतो. तापमान अधिक वाढले की, पावसाची सुरुवात लवकर होण्यास मदत होते.
हिंदू संस्कृतीत नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राचीन काळापासूनच आहे. धार्मिक ग्रंथातून मिळालेला अभ्यास वास्तव परिस्थितीत तपासून नऊ दिवसांतील ऊन-पावसाचा खेळ पावसासाठी महत्त्वाचा ठरतो. नवरात्रीत सुरुवातीला पावसाने हजेरी लावली व शेवटीसुद्धा हजेरी लावली. शेवटी हा अंदाज असला तरी काहीअंशी प्रेरक ठरतो.
- रमेश पराते
परंपरागत हवामान अभ्यासक, पालांदूर.