लोकमत शुभ वर्तमान : शेतीसह जोडउद्योगाला उभारी देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाहीभंडारा : घरातील महिला शिकली म्हणजे, समाजाला शिकविल, अशी म्हण प्रचलित आहे. या म्हणीला सार्थ ठरविले पवनी तालुक्यातील काही महिलांनी. कुटुंबाचा रथ चालविण्यासाठी शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून महिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाची महती कळताच, जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी महिलांच्या प्रत्यक्ष कार्याची पाहणी करून त्यांच्या कर्तृत्वाला उभारी देण्याची ग्वाही दिली. पवनी तालुक्यातील निष्टी येथील कोसा निर्मिती धागा व कापड तयार करणाऱ्या सोबतच प्रगतीशिल महिला बचत गट व शेतीला जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सिंगोरी येथे भेट देवून कृषक महिला शेतकरी गटामार्फत सुरू असलेल्या अळंबी युनिटला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी अझोला प्रात्यक्षिकांची पाहणी केली. महिलांनी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली व गटातील महिलांशी चर्चा करून येणाऱ्या अडचणींची माहिती करून घेतली. महिलांनी स्वयंसिध्द बनण्यासाठी उचललेले पाऊल वाखाणण्याजोगे असल्याने तयार होणाऱ्या मालाच्या विक्रीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना केल्या. सिंगोरी हे छोटेसे गाव असून गावामध्ये कृषी विभागाचे तीन गट स्थापन आहेत. यामध्ये कृषक महिला शेतकरी गट असून गटामध्ये ११ महिला आहेत. गटामार्फत अळंबी उत्पादन व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांना आत्मा अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत असून अळींबी स्पॉन व अन्य साहित्य देण्यात आले. या गटामार्फत १० बाय १५ च्या खोलीत अळंबी युनिट सुरू केले आहेत. यामध्ये २०० बेड तयार करून प्रतिबेड १ ते १.५० किलो ओली अळींबी मिळण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत २०० रूपये प्रति किलो बाजारभाव आहे. यापासून त्यांना ३० हजाराचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. हे पीक ३० ते ४५ दिवसाचे आहे. पशुखाद्याकरिता येणाऱ्या खाद्यावर उपाय म्हणून आत्मा अंतर्गत गटाला पशुखाद्य अझोला प्रात्यक्षिक देण्यात आले. खाद्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये २० ते २५ टक्के वाढ, होत असून जनावरांचे आरोग्य उत्तम राहत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आत्माच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.वायगाव येथे हळदीची पाहणीजुनोना गावाला भेट देऊन संताजी कृषी गटामार्फत बेडवर लागवड केलेल्या वायगाव जातीच्या हळद पिकाची पाहणी केली. यामध्ये त्यांना प्रती एकर ४,००० रूपयाचा लाभ देण्यात आला. शेतकऱ्यांनी लावगडीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये बेडवर लागवड, बेणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन केले आहे. यामध्ये सदर गटाला हळदीवर प्रक्रिया करून त्यांची हळद पावडर तयार करून गटामार्फत विक्री करून जास्त आर्थिक नफा मिळवायचा आहे. याकरिता त्यांनी गटामार्फत ४९ हजाराचे हळद पॉलिश यंत्र खरेदी केले आहे. उकळणी सयंत्राकरिता प्रधानमंत्री रोजगार योजनेंतर्गत प्रस्ताव तयार करण्याच्या गटाचा मानस असल्याचे महिलांनी सांगितले. हळदीच्या पानापासून तेल काढणे व कुकुरमीन व अन्य माहिती घेत आहेत. यावेळी गटाचे अध्यक्ष मुरलीधर वंजारी यांनी ठिबक सिंचनावर लागवड केलेल्या तूर पिकाची पाहणीही त्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य शेतकरी गटांनी व शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन शेतीपरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योग सुरू करावे, असे आवाहन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, आत्माचे प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ.नलिनी भोयर, नाबार्डचे प्रबंधक अरविंद खापर्डे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ज्योती निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी आदेश गजभिये, कृषी पर्यवेक्षक लोखंडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पी.पी. पर्वते, एल.एल. शहारे, जी.बी. राऊत, किशोर भुरे, पुंडलिक घ्यार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
पवनीतील महिला बचत गट बनला ‘स्वयंसिध्द’
By admin | Updated: October 3, 2015 00:31 IST