सालेभाटा येथे दारुबंदी : अखेर दारू दुकानाला लागले कुलूप लाखनी : तालुक्यातील सालेभाटा येथील महिला शक्तीने एकत्र येऊन दारुबंदी संघर्ष समिती स्थापन करून गाव दारुमुक्त करून वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. गावातील देशी दारुचे दुकान व बार बंद करण्यात आल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.सालेभाटा येथे दारुबंदीविषयी महिला जागरूक होऊन जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन मतदान करण्याची विनंती केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांचे मतदान घेण्याचे आदेश दिले. महिलांचे मतदान ९८८ होते. फेरनिवेदनातील महिलांची संख्या ६७६, सही अंगठ्याच्या पडताळणीत पात्र महिलांची संख्या ५७१, पात्र महिलांच्या संख्येची टक्केवारी ५७.७९ टक्के होती. मतदानासाठी निवेदनातील महिलांची स्वाक्षरी, अंगठा निशानीच्या अधिप्रमाणतेची टक्केवारी २५ टक्के एवढी होती. संघटीत महिलाशक्ती गावाचे चित्र पालटू शकते हे सालेभाटा येथील महिलांच्या आंदोलनातून सिद्ध झाले. २० ते २२ गावांचे केंद्र असलेल्या सालेभाटा येथे गावाच्या मध्यभागी चौकात देशी दारु विक्रीचे दुकान होते, त्यामुळे या चौकाला दारुभट्टी चौक असे नाव मिळाले होते. आता दारु दुकान बंद झाल्यामुळे चौकाचे नामकरण करण्याचा निश्चय महिलाशक्ती दारुबंदी संघर्ष समितीने केला आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या आदेशानुसार २४ फेब्रुवारीला सालेभाटा येथील परवानाप्राप्त देशी दारुचे दुकान व बिअर बार बंद करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करून दुकान बंद केले. तत्पूर्वी सालेभाटा येथे २१ फेब्रुवारीला महिला मतदाराचे मतदान घेण्यात आले होते. गावातील ९८८ महिला मतदारांपैकी ७२८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता यामध्ये ६८५ महिला मतदारांनी आडव्या बाटलीला तर ३० मतदारांनी उभ्या बाटलीला मतदान केले. १३ मत अवैध ठरली. बाजार समितीचे माजी संचालक व ग्रामपंचायत सदस्य कैलाश भगत यांच्या पुढाकाराने २० आॅगस्ट २०१५ ला विशेष महिला ग्रामसभा घेऊन व त्यात दारुबंदीचा ठराव घेऊन या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. महिला बचत गट, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील महिला मंडळांना सोबत घेऊन सुरु झालेल्या आंदोलनात ओमप्रकाश पटले, देवराम शेंडे, नरेश बोपचे, विनोद रहांगडाले यांनी सक्रीय सहभाग दिला.महिलाशक्ती दारुबंदी संघर्ष समितीतर्फे ७ जानेवारीला ६७६ महिलांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आला होता. यावर २१ जानेवारीला स्वाक्षरी पडताळणी झाली होती. २५ टक्के स्वाक्षरीची गरज असताना ५७५ स्वाक्षऱ्या पात्र ठरवण्यात आले. पुढील मतदानाच्या कारवाईचा आदेश २ फेब्रुवारीला देण्यात आला अशा पद्धतीने अत्यंत कमी कालावधी दारुबंदी आंदोलन यशस्वी झाले. मतदान प्रक्रियेने पवनी तालुक्यातील खैरी (दिवान) गावात दारुबंदी झाली त्यानंतर लाखनी तालुक्यातील सालेभाटाचा दुसरा क्रमांक आहे. सालेभाटा येथील दोन्ही दुकानातून १० ते १५ लक्ष रुपयाची दरमहा विक्री होत असे. दारुबंदीमुळे सालेभाटा परिसरातील पैशाची बचत होणार व आरोग्यात सुधारणा होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
महिलाशक्तीने केली दारुची बाटली आडवी
By admin | Updated: February 28, 2016 00:50 IST