भंडारा : सुरेवाडा येथील जुन्या व नवीन (पुनर्वसित) वस्तीमधील गावकऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडवून त्वरित न्याय पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी भाकपचे नगरसेवक हिवराज उके यांनी सुरेवाडा येथील सभेत केली.सुरेवाडा पुनर्वसन येथे भाकप शाखा सुरेवाडा व शाखा खमारीच्या वतीने गावकऱ्यांच्या प्रश्नावर जनजागरण सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला हजारे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिवराज उके होते. यावेळी हरिभाऊ खोब्रागडे व सुरेंद्र सुखदेवे यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर ग्रा.पं. सदस्या पूनम जंजारे, वानमाला सुखदेवे, माजी सरपंच शीला हजारे, ताराचंद आंबाधरे, गणेश चिचामे, वामनराव चांदेवार, रत्नाकर मारवाडे, स्वप्नील भोवते, अरविंद पाटील, मंगेश माटे व दिनेश शहारे हे विराजमान होते.याप्रसंगी हिवराज उके म्हणाले, ६ वर्षे लोटून अजूनही अनेक अ वार्डप्राप्त लोकांना भूखंड मिळालेला नाही. काहींना अपुरी जागा मिळाली. काहींना पैसे मिळून प्लॉट मिळाला नाही. काहींच्या सोबत भेदभाव पूर्णव्यवहार झाला. काही प्लॉटधारकांनी अतिक्रमण केले तर मागील २५ - ३० वर्षापूर्वीपासून राहणाऱ्या बेघर भाडेकरुंनाही प्लॉट दिले गेले नाही. सध्या गाव खाली करण्याच्या सूचना असल्याने भाडेकरूंना घर मिळणे कठीण झाले आहे. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.एवढेच नव्हे तर या पुनर्वसीत गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. थोडी फार पाईप लाईन आहे ती ही फुटली आहे. बोअरिंग फारच कमी आहेत. पक्के रस्ते नाहीत. अजून स्ट्रीट लाईट सुरु झाली नाही. अशा अनेक तक्रारींचा पाढा हिवराज उके यांनी सभेत वाचला. या स मस्या सोडविच्यासाठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी विशेष लक्ष द्यावे. त्याच बरोबर सुरेवाडा खमारी नाल्यावर पुलाचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने करावे, अशी मागणी देखील हिवराज उके यांनी केली. संचालन खमारी शाखा सचिव रत्नाकर मारवाडे यांनी तर आभारप्रदर्शन सुरेंद्र सुखदेवे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
सुरेवाडावासीयांचे पुनर्वसन केव्हा होणार?
By admin | Updated: June 16, 2014 23:22 IST