अड्याळ : भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील त्या सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने तेथील शेतकऱ्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, पन्नासी, भिकारमिन्सी, एटेवाही, सोनेगाव आणि पागोरा या गावातील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.दिवसेंदिवस पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतीला अस्मानी तद्वतच सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागत आहे. त्याकरिता रावणवाडी जलाशयाचे पाणी या गावापर्यंत गेल्यास त्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. यापूर्वी रावणवाडी जलाशयाचे पाणी इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला, बोरगाव खुर्द, वाकेश्वर, रावणवाडी इत्यादी गावांना पुरविण्यात येत होते.आता टेकेपार उपसा सिंचन योजना सुरु झाल्याने रावणवाडी जलाशयाशी जोडलेले असलेले इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला ही १० गावे आता टेकेपार उपसा सिंचन येथे जोडले आहेत. त्यामुळे रावणवाडी जलाशयाचे पाणी फक्त बोरगाव खुर्द, वाकेश्वर, रावणवाडी या तीनच गावांना मिळत आहे. त्यामुळे रावणवाडी जलाशयात बरेच पाणी शिल्लक राहते. ते शिल्लक राहिलेले पाणी त्या सात गावांना मिळाल्यास त्या गावातील शेतकऱ्यांना जलसिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते.त्याकरिता रावणवाडी जलाशयापासून सोनेगाव, एटेवाही, गोलेवाडी, डोंगरगाव येथून नवीन नहर काढल्यास वरील गावांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते. तसेच पाणी कमी पडल्यास टेकेपार उपसा सिंचनाचे पाणी रावणवाडी जलाशयात सोडल्यास पाणी कमी पडणार नाही. त्याकरिता या क्षेत्रातील आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
सिंचनाची सुविधा केव्हा होणार?
By admin | Updated: March 9, 2016 01:45 IST