भावही मातीमोल : उत्पादनावर आधारित रास्त भावाचा विचारच नाहीपालांदूर : शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळावा त्याचप्रमाणे शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी आधारभूत किमती ठरवून दिल्या आहेत. मात्र ज्या मूल्यांकनाने शेतमालाची आधारभूत किंमत ठरविण्यात आली, त्यामध्ये शेतमाल उत्पादकांवर अन्यायच केला जातो. शेतमालाला देण्यात येणारा भाव शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासारखा आहे. ज्या भावामध्ये शेतमालाची विक्री करावी लागते ते भाव परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.जिल्ह्यात मुख्यत्वे धानाचे पीक घेतले जाते. लाखनी हा धान उत्पादक तालुका म्हणून ओळखला जात असून या परिसरातील शेतकरी विविध प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या धानपिकांचे उत्पन्न घेत असतात. परंतु धान उत्पादक शेतकरी प्रगतीऐवजी अधोगतीकडेच जात असल्याचे चित्र आहे. शेतकरी खरीप हंगामात जवळपास पाच ते सहा महिने आपल्या कुटुंबासोबत राबत असतो. रब्बी हंगामातही राबून शेती कसत असतो. मात्र त्याला हव्या त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. शेतकरी कर्जाच्या ओज्याखाली दबला जात असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसागणीक वाढ होत आहे.यासाठी शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या परिसरामध्ये सिंचनाच्या सोयी नाहीत. बी-बियाणे, खत मजुरी, कीटकनाशके, औषधी यांचे भाव गगणाला भिडले आहे. धानाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येऊन शेतकरी घाट्यामध्ये शेती व्यवसाय करीत आहे. उत्पन्न कमी झाले तरी कर्ज काढून शेतकरी दरवर्षी चांगले उत्पादन होण्याच्या आशेने शेती करतो. परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि धान पिकांवर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव, जंगली प्राण्यांकडून होणारे नुकसान यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. (वार्ताहर)
धान उत्पादक शेतकऱ्यांची अधोगती केव्हा थांबणार?
By admin | Updated: November 26, 2015 00:42 IST