पाणी प्रश्न पेटणार : ४१६ उपाययोजनांसाठी २.६३ कोटींची तरतूद इंद्रपाल कटकवार भंडाराजिल्ह्यातून वाहणाऱ्या जिवनदायिनी वैनगंगेचा जलस्तर पाहता आणि भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा असला तरी जीर्ण पाईपलाईन ठिकठिकाणी फुटलेली आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे तीव्र संकेत मिळाले आहेत. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे बळावली आहे. प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ जानेवारी ते जूनचा बृहत आराखड्यात २६३ गावांसाठी ४१६ उपाययोजना सुचविल्या असूनया उपाययोजनांसाठी २ कोटी ६३ लक्ष ८३ हजार रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा आहे. म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या यादीत टँकरमुक्त म्हणून घोषित आहे. जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. यात मात्र चुलबंद नदीची स्थिती चिंताजनक आहे. नदीचे पात्र कोरडे पडले आहे. दुसरीकडे पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. काही गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी बरसला. मे व जून महिनादरम्यान अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न पेटणार आहे. पाणी राष्ट्रीय संपत्ती आहे, पाण्याचा वापर जपून करा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात येते. मात्र, पाण्याच्या अपव्ययामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जिल्हा प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ एप्रिल ते जूनचा कृती आराखडा तयार केला. यात ८० विहीरी खोल करणे आणि त्यातील गाळ काढण्याचे प्रस्तावित आहेत. ३१ नळयोजनांची दुरूस्ती तर ५६ गावांमधील १५७ विंंधन विहीरींची दुरूस्ती, १२ ठिकाणी कुपनलिका घेण्याचा प्रस्ताव आहे. या गावांमध्ये पाणी टंचाई असली तरीसुद्धा टँकर किंवा बैलबंडीने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था नाही. जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहत असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत बऱ्यापैकी आहे. त्यामुळे नळयोजना प्रभावी करण्याची गरज आहे़ पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. ग्रामीण भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याच्या पुनर्वापरासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे.
२६३ गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट
By admin | Updated: January 20, 2016 00:47 IST