राहुल भुतांगे ल्ल तुमसर गत शंभर वर्ष जुनी परंपरेनुसार मेघनाथ, वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी धुळवडीच्या दिवशी गरदेवाची पूजा करण्याबरोबरच यात्रेलाही महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी लगतच्या मध्यप्रदेशासह दूरवरून भाविकांचे यात्रेसाठी येणे सुरु झाले आहे.विविध ठिकाणी विशेष उत्सवाचे औचित्य साधून यात्रेचे आयोजन होत असले तरी तालुक्यातल्या आष्टी येथे मरणाऱ्या गरदेवाची यात्रा ही आपल्या विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मेघनाथ वरूण राजाला प्रसन्न ठेवण्यासाठी ही यात्रा भरविण्यात येते, अशी समजूत आहे. बावनथडी नदीच्या काठावर वसलेल्या समृद्ध अशा आष्टी गावात सातत्याने कोरडा दुष्काळ पडला. त्यामुळे वरूण राजाची कृपादृष्टी सदैव राहावी म्हणून मेघनाथाची म्हणजेच गरदेवाची पूजा धुळवडीच्या दिवशी आष्टीवासीयांनी केली.ती परंपरा आजही जोपसली आहे. या यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे गरजदेवाला लागणारी अखंड लाकडे आहेत. ती लाकडे लगतच्या व परिसरातील जंगलातून दर चार चार वर्षांनी शंभर ते दीडशे बैलजोड्याच्या माध्यमातून आणले जातात. यातील लाकूड तर मादी प्रजातीचे आहेत हे आपसूकच पुजारी व गावकरी ओळखतात. जंगलातील सांडापैकी एकमेकांची सावली एकमेकांवर पडत असेल अशाच झाडांची निवड गरदेवाच्या पूजेसाठी केली जाते. अशी झाडे जंगलात शोधणे जरा कठीणच आहे. मात्र गरदेवाच्या पुजाऱ्याला नेमकी जागा व झाडे दिसत असल्याने नेमक्या त्याच ठिकाणातून गरदेवाच्या पूजेकरिता लाकडे दर चार चार वर्षांनी शंभर दीडशे बैल जोड्याच्या सहाय्याने ओढत आणतात. लाकुड आणत असताना ते लाकूड चांगल्या रस्त्यावर कुठेही अडून पडले की नारळ फोडल्या जाते व नंतरच ते लाकूड पुढे सरकत असते. असे त्या लाकडांचे महत्व असून याच लाकडांना वांगा लावला असतो. त्या वांग्याचे पूजारी चार फोडी करून चारही बाजूला फेकण्यात येते. असा प्रकार प्राचीन काळापासून सुरूच आहे. त्यामुळे दूरवरून भाविक याठिकाणी येत असतात. भाविकांचे मनोरंजन व्हावे याकरिता यात्रेचेही आयोजन होत असते. याठिकाणी टुरिंग टॉकीज, सर्कस, मौत का कुआ जादूगर आदी यात्रेत येत असल्याने ही यात्रा जवळपास सव्वा महिना चालत असे. मात्र कालांतराने यात्रेचे स्वरुप लहान जरी झाले असले तरी गरदेव, मेघनाथच्या पूजेला महत्व प्राप्त झाल्याने भाविकांची रिघ या ठिकाणी लागते.मानेगावात दर्शनासाठी गर्दी४मानेगाव (बाजार) येथे होळी सणानिमित्त गरदेवाची यात्रा भरणार असून भाविकांची गर्दी उसळणार आहे. गावाला रघुजी राजे भोसले यांचे वास्तव्य लाभलेले असल्याने त्यांच्या काळापासून हा उत्सव अविरतपणे येथील नागरिकांनी जोपासला आहे. येथील हनुमान मंदिर आजही प्राचीन कलेची साक्ष देत आहे. मंदिराच्या पूर्व दिशेला निसर्गरम्य ठिकाण गरदेव आहे. दोन खांब उभे असलेली ही प्रतिकृती लोकांचे लक्ष वेधून घेते. धुळवडीच्या दिवशी दुपारी ३ वाजतापासून उत्सवाला सुरुवात होत असते. या उत्सवात सर्व जातीधर्माचे नागरिक सहभाग होत असून एकात्मतेची भावना जोपासली जात आहे.
धुळवडीला आष्टीत भरणार ‘गरदेवा’ची यात्रा
By admin | Updated: March 24, 2016 01:21 IST