पवनी : पवनी तालुक्यात ग्रामीण भागासह शहरी भागात विषाणूजन्य तापाची साथ पसरली आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत आहे. अनेक गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यातच विहीरी व बोरवेलमध्ये ब्लिचिंग पावडर टाकणे बंद झाले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. गावागावातून रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र यासंदर्भात आरोग्य विभागाकडून दखल घेण्यात आली नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. ज्यांच्याकडे पैसे आहे ते खासगी रुग्णालयात जावून उपचार करून घेत आहेत. मात्र गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता जावे लागत आहे. परंतु शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आणि नियोजनाअभावी रुग्ण शासकीय रुग्णालयात जाणे टाळत आहेत. याकडे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. यावर्षीच्या पावसाने हुलकावणी दिली. उन्हाळ्यापेक्षाही जास्त उन्हाचा तडाखा बसत आहे. उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. गावागावात तापाचे रुग्ण वाढले आहेत. ताप कोणताही असला तरी डेंग्यूचा ताप तर नव्हे अशी भीती गावकऱ्यांमध्ये पसरत आहे. डेंग्यू हा आजार भयावह असल्याची धास्ती लोकांमध्ये आहे. त्यामुळे उपचारासाठी रुग्णांची धावपळ सुरु आहे. मात्र आरोग्य विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील जनतेवर उपचार व्हावे यासाठी गावाच्या मध्यभागी आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांसह आयुर्वेदिक दवाखाने, ग्रामीण रुग्णालये बांधण्यात आलेली आहेत. यासाठी दररोज लक्षावधी रुपयांचा खर्च होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पवनी तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ
By admin | Updated: August 24, 2014 23:17 IST