सिंदपुरीत संताप : प्रकरण तलाव फुटल्याचेचुल्हाड (सिहोरा) : सिंदपुरी येथील गावतलाव फुटल्यानंतर झालेल्या तबाहीत ग्रामस्थांना शासनस्तरावर मदतीला विलंब होत असल्याने समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी तीन दिवसांचा जिल्हा प्रशासनाला अल्टीमेटम दिला आहे. मुलभूत सुविधा प्राप्त न झाल्यास रास्ता रोको आंदोलनासाठी ३० जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मदतीसाठी सिंदपुरीवासीयांमध्ये संताप असून दुसरीकडे स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.सिंदपुरी येथील आपादग्रस्तांना शासनस्तरावर मदत मिळत नसल्याची ओरड आहे. स्वयंसेवी संस्था मदतीला धावून आल्या आहेत. तुमसर तालुक्यात आलेल्या मॉयल प्रशासनामार्फत आपादग्रस्तांसाठी १०१ टिनाचे शेड उभारण्यात येणार आहेत. तलावाची पाळ फुटल्यानंतर पाणी गावात शिरले. यात ७०० नागरीक बेघर झालेत. आपादग्रस्त नागरिकांची सोय पाच दिवसांपासून शाळा आणि समाजमंदिरात करण्यात आली आहे. एका समाजमंदिरात १०० हून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. शाळेतील खोल्या हाऊसफुल्ल आहेत. शासनस्तरावर गावकऱ्यांना भरीव मदत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्याप्त आहे. जिल्हा प्रशासन फक्त सांत्वना देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावात दूषित पाण्याची समस्या आ वासून उभी आहे. शाळा बंद आहेत. रोजगारांची कामे ठप्प झाली असल्याने आर्थिक टंचाईचा सामना आपादग्रस्तांना करावा लागत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. हक्कासाठी व समस्या निकाली काढण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून ३० जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तालुका स्तरावर आपत्तीनिवारण कक्ष असले तरी तातडीची मदत गरजूंना मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे स्वयंसेवी संस्थांमार्फत अन्नधान्य, कपडे व आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.(वार्ताहर)
समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांचा अल्टीमेटम
By admin | Updated: July 27, 2014 23:34 IST