लाखनी : यावर्षी वर्ग ११ च्या कला शाखेतील ग्रामीण भागातील वर्ग तुकड्यांना विद्यार्थी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे अनुदानित तुकड्यांना वाचविण्याचा शिक्षकांकडून आटोकाट प्रयत्न केला जात आहे. शिक्षण विभागाने विज्ञान विभागाच्या तुकड्यांना निर्धारीत संख्येव्यतिरिक्त संख्या भरण्यास वा वाढीव विज्ञान तुकडीला मान्यता देण्यात येवू नये अशा आशयाचे निवेदन विजुक्टा कार्यकारिणीने जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांना दिले.ग्रामीण भागातील कला शाखेतील विद्यार्थी संख्या रोडावत चालली असून तुकडीपट संख्या टिकविणेही कठीण झाले आहे. सत्र २०१२-१३ मध्ये एस.एस.सी. परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागल्यामुळे २०१३-१४ मधील वर्ग ११ च्या तुकडीला एटीकेटी अंतर्गत मान्यता देण्यात आली. यंदा एटीकेटीचे विद्यार्थी दोन सत्र सवलतीमध्ये उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे यंदा २०१४-१५ सत्रातील वर्ग १२ वी च्या तुकडीला विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्यामुळे या तुकड्या तुटण्याच्या मार्गावर आहेत. अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.वर्ग दहाच्या निकालावरच कनिष्ठ महाव्दियालयांची पटसंख्या टिकविली जाते. मात्र शासनाने ३५ टक्के मिळविणाऱ्यांनाही व विज्ञान व गणित विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीतून विज्ञान विषयाला प्रवेश देण्याची सोय केल्यामुळे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला तुकड्यांचे नजीकच्या काळातील भविष्य धोक्यात आले असल्याचे निवेदकांनी शिक्षणाधिकारी शेंडे व शिक्षण उपसंचालकांना अवगत करून दिले. यावेळी विना अनुदानित व अनुदानित विज्ञान शाखेतील पटसंख्या निर्धारीत संख्येच्या कर देण्यात येवू नये तसेच वाढीव तुकड्यांना मान्यता देण्यात येवू नये, या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षण उपसंचालकांनी भंडारा जिल्ह्यातील स्थिती अवगत करून देण्यात येईल व योग्य निर्णय देण्यात येईल असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यान्ांी उपस्थित विजुक्टा जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.निवेदन व चर्चेत विजुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा.मार्तंड गायधने, सचिव प्रा.राजेंद्र दोनाडकर, प्रा.गोंधोळे, प्रा.गेडाम, प्रा.जगन माकडे, प्रा.रुसेश्वरी, प्रा.बोरकर, प्रा.जांगळे, प्रा.गौर आदी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
विजुक्टाचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
By admin | Updated: July 27, 2014 23:36 IST