साकोली : साकोली वन विभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाथरी जंगलातून मागील आठवड्यात सागवनचे झाड चोरीला गेले होते. या चोरीत वापरण्यात आलेला आॅटो वनअधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे. मात्र या चोरीतील मुख्य आरोपी फरार असून वनविभागाचे पथक मागावर आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात सागवनचे झाड तोडल्याची माहिती उघडकीस आली आहे.वन विभागाला सागवन चोरीची माहिती मिळताच चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान दि.१९ रोजी प्रमोद मेश्राम या इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याने तिघांची नावे सांगितली असली तरी मुख्य आरोपी मात्र फरार आहे. मेश्रामच्या बयानानुसार पाथरी जंगलातील सागवन झाड तिघांनी हातआरीने कापण्यात आले. त्यानंतर लाकडाचे पाच तुकडे करण्यात आले. रात्रीच किन्ही येथून एका आॅटोने ही सर्व लाकडे सातलवाडा येथे रामटेके यांच्या घरी ठेवण्यात आले.बयानावरून वनअधिकाऱ्यांनी गुरुवारला रंजित क्षीरसागर (२३) रा. किन्ही (मोखे) याला ताब्यात घेतले. रंजित हा आॅटोचालक असून लाकडे नेल्याची कबुली दिली. त्याने हा आॅटो लाखनी येथे एका गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी ठेवला होता. वनक्षेत्राधिकारी येसनसुरे, क्षेत्रसहायक पठाण व बिटरक्षक देविड मेश्राम यांनी आॅटो क्रमांक एमएच-३६/एफ-९९२ येथे आणण्यात आला आहे.यापूर्वीही तोडण्यात आला झाडयाच पाथरी जंगलातून जानेवारी महिन्यात सागवनचा एक झाड तोडण्यात आला होता. मात्र सागवन तस्करांना संधी न मिळाल्याने तो झाड जंगलातच फेकून दिला होता. याप्रकरणी वनअधिकाऱ्यांनी तुडमापुरी येथील एकाला ताब्यात घेतले होते. मात्र तपास अधांतरी आहे. आठ महिन्याचा कालावधी लोटला असून आठ महिन्यात आरोपी मिळाला नाही.फिरते पथकाचा उपयोग काय?अवैध वृक्षतोड यावर आळा बसावा यासाठी वनविभागातर्फे फिरते पथकाची व्यवस्था केली. मात्र साकोली परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर आळा बसवू शकलो नाही. पावसाळा संपला की सागवन तस्कर जंगलातील सागवन झाडे तोडून चिरान तयार करतात. ते चिरान आर्डरप्रमाणे विकतात. वनविभाग रात्री गस्तीवर जात नसल्यामुळे हे तस्कर सायकलने विल्हेवाट लावतात. (तालुका प्रतिनिधी)
सागवन चोरी प्रकरणातील वाहन वन विभागाच्या ताब्यात
By admin | Updated: August 23, 2014 01:29 IST