जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मार्गदर्शनगोंदिया : मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचे योग्य संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड व त्याची जोपासणा करणे आवश्यक आहे. आजच्या विज्ञान युगात मोठ्या प्रमाणात मानव भौतिक सुखाच्या आहारी गेला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. सूर्यवंशी बोलत होते. अध्यक्षस्थानी न्या. के.आर. सिंघल, तर अतिथी म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी कातोरे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक दिलीप देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.न्या.सिंघल म्हणाले, पर्यावरण संतूलन राखण्यासाठी वृक्षलागवड व त्याची जोपासणा करणे महत्वाचे आहे. पर्यावरणाचे फायदे व कायद्याबाबतची माहितीही त्यांनी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आशा ठाकूर, लागवड अधिकारी युवराज कुंभलकर, पुरुषोत्तम कावळे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते जारुळ, निंब, सप्तपर्णी आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला वन्यजीव रक्षक सावन बहेकार, डॉ.राजेंद्र जैन, रंजित जस्सानी, सहायक वनसंरक्षक अश्विन ठक्कर, गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यासह वनविभाग, सामाजिक वनीकरण वन्यजीव विभाग, निसर्ग मंडळाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक उपवनसंक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर आभार सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक दिलीप देशमुख यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)वृक्ष भेट देऊन सत्कारपर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील वनसंरक्षण समितीला संत तुकाराम महाराज वनग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष व सरपंच, फुलचूर येथील विजय कावळे, नर्मदा भजन मंडळाचे माधव गारसे यांना वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याबद्दल पोलीस विभागाचे प्रतिनिधी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांना मान्यवरांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकाच्या घरी असावे तुळशीचे झाडन्या.सिंघल म्हणाले, पर्यावरणात तुळशीच्या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशीच्या वृक्षापासून मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन मिळते व औषधी म्हणून तुळशीच्या पानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. प्रत्येकाने घरी तुळशीचे झाड लावले पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, दैनंदिन वापरामध्ये पॉलिथिनचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. परंतु पॉलिथिन ही वस्तू नष्ट होणारी नसल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम आज दिसून येत आहेत. पॉलिथिनच्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. टाकाऊ साड्यापासून पिशव्या तयार करुन त्याचा दैनंदिन वापर करावा. महिला बचतगटाच्या माध्यमातून पिशव्या तयार करण्यात याव्यात. त्यामुळे बचतगटाला रोजगार आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होईल. वृक्ष लागवड केल्यास पर्यावरण संरक्षण आणि वृक्षांपासून औषध निर्मिती सुद्धा करता येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करा
By admin | Updated: June 8, 2015 01:10 IST