मुजबी शिवारातील घटना : एक ठार दोन जखमी, मध्यरात्रीपर्यंत वाहतूक विस्कळीतजवाहरनगर : गुजरातहून रायपूरकडे जाणारा ट्रक व भंडाराहून नागपूरकडे जाणारा ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास मुजबी शिवारात घडली.गणेश मनोहर झंझाड (३०) रा.गुंथारा (लाखनी) जि.भंडारा असे मृत चालकाचे नाव आहे. यात दोन इसम जखमी झाले. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे मध्यरात्रीपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. भंडाराहून नागपूरकडे खरडा वाहून नेणारा ट्रक एम.एच. २० ए.टी. ६२८९ व गुजरातहून रायपूरकडे पावडर भुकटी वाहून नेणारा ट्रक सी.जी. ०४ जे.डी. ५७९३ यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात सीजी ०४ जे डी ५७९३ चा चालक गणेश झंझाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातातील जखमींमध्ये प्रदीप भाऊराव ठवकर रा.गुजराती कॉलोनी रा.लाखनी, दादा केशव जाधव (५०) रा.सुरुडी (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून तपास पोलीस उपनिरीक्षक आर.पी. गायकवाड करीत आहे. (वार्ताहर)
दोन ट्रकांची समोरासमोर भीषण धडक
By admin | Updated: January 5, 2016 00:31 IST