तुमसर : वीटभट्टीकरिता लागणाऱ्या लाकडांसाठी येथील शेतकरी नियमबाह्यपणे वृक्षतोड करीत आहे. यात शासनाचा हजारोंचा महसूल बुडत असून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. या गोरखधंद्याकडे महसूल तथा वनविभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.५० ते ६० वीटभट्ट्या येथे सुरू असून महसूल प्रशासनाची त्यांना परवानगी नाही. माती व रेतीपासून या विटा तयार केल्या जातात. त्यांना टणकपणा यावा याकरिता मोठ्या प्रमाणात लाकडांची गरज असते. शेतकऱ्यांकडून वीटभट्टी मालक परस्पर शेतातील उभी झाडे खरेदी करतो. रात्री या झाडांची रवानगी वीट भट्टीवर केली जाते. काही विटभट्टी मालक संबंधित अधिकाऱ्यांकडे रितसर अर्ज शेतकऱ्यांच्या नावाने सादर करून शासनाची परवानगी मागतात. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज निकाली निघण्यापुर्वीच त्या झाडांची कत्तल केली जाते.शहरापासून अवघ्या अडीच ते तीन कि.मी. अंतरावरील नवरगाव शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील २५ ते ३० आंजन, मोह, बोर, बाभूळ झाडांची वृक्षतोड करण्यात आली. या झाडावर वनविभागाने हातोडा मारला नाही. नियमानुसार झाड कापल्यावर सहायक वनसंरक्षक थूटाच्या बाजूला ठेवलेला लाकूड मोजून तपासून पाहतो. नंतर त्यावर क्रमांक घालून हातोडा मारतो. जे झाड कापले आहे तेच झाड आहे काय, हे बघितल्यावरच वनविभाग कारवाई करतात. येथे कोणतीच परवानगी नाही, हातोडा नाही, मग कापलेली झाडे गेली कुठे हा मुख्य प्रश्न आहे. ही झाडे एका वीटभट्टी मालकाने नेली अशी माहिती आहे. कारवाई करण्याकरिता कुणीच अधिकारी पुढे येत नाही. नियमानुसार वीटा टणक तयार करण्याकरिता धान गिरणीतील कोंड्याचा वापर करावा असे बंधन आहे. कोंढा महाग पडतो व वीटा पाहिजे तेवढ्या टणक होत नाही. त्यामुळे लाकडांचा वापर वीटभट्टी मालक सर्रास करतात. लाकडे जाहीर लिलावाद्वारे अथवा उपविभागीय अधिकारी व वनविभागाने लाकडांना परवानगीने वापरता येतात, वनविभागाचे नियम कडक असल्याने नियमानुसार सहजासहजी लाकडे उपलब्ध होत नाही. पर्यावरण रक्षण केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याची येथे निश्चितच खात्री होते. मागील अनेक महिन्यापासून येथे हा व्यवसाय फोफावला आहे हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)
वीटभट्टी मालकांकडून परवानगीविना वृक्षतोड
By admin | Updated: December 15, 2014 22:50 IST