संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून डोंगरगावात रिवर्स ट्रॅक्टरचा शंकरपट भरविण्यात आला होता. या गावाने १०३ वर्षांच्या शंकर पटाची परंपरा जपली आहे. न्यायालयाने बैलांच्या पटावर निर्बंध घातले. काळाच्या ओघात डोंगरगावाच्या पटाची परंपरा खंडित होते की काय, असे गावकऱ्यांना वाटत होते. पण, गावाच्या पटाची रूढी टिकवायचीच आहे, असा निर्धार आयोजक व नादखुळा असलेल्या रामकृष्ण ईटनकर यांनी केला. दोन वर्षांपूर्वी घोड्यांचा पट भरविला गेला. त्या पटाचा आर्थिक भार सहन झाला नाही. त्यामुळे संक्रांतीला दोन दिवस रिवर्स ट्रॅक्टरचा पट भरला. या पटात पहिल्या दिवशी नऊ ट्रॅक्टर व दुसऱ्या दिवशी २४ ट्रॅक्टर ९० मीटरच्या धावपट्टीवर रिवर्स गियरमध्ये धावले. बघ्यांनी या अनोख्या पटाचा आनंद लुटला. डोंगरगाव येथील प्रवीण सेलोकर यांनी ९० मीटर असलेल्या धावपट्टीवर ३३ सेकंदात रिवर्स ट्रॅक्टर चालवून ५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. डोंगरगावाच्याच प्रकाश मानकर यांनी ३४ सेकंदात धावपट्टी पार करून तीन हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. ३५ सेकंदात धावपट्टीची अंतिम रेषा इंदुरखा येथील गणेश भुरे यांनी पार केली. त्यांना एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
बॉक्स
या नाविन्यपूर्ण पटाचा आस्वाद आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार दादा शेंडे, माजी आमदार अनिल बावनकर, किसान सभेचे नेते सदानंद ईलमे यांच्यासह अनेक लोकांनी घेतला.