उच्च न्यायालयाचे निर्देश : चार महिन्यांत होणार निवडणूकमोहन भोयर तुमसरराज्यात तांदळाकरिता प्रसिध्द तुमसर-मोहाडी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. येत्या चार महिन्यात निवडणूका घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिले. तब्बल ६ वर्षे ७ महिन्याच्या लांब कार्यकाळानंतर येथे निवडणूक होत आहेत. निवडणुकीकरिता राजकीय पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. राजकारणाच्या केंद्रबिंदू म्हणून या बाजार समितीकडे पाहिले जाते. थेट शेतकऱ्यांशी संबंधित असेली व दोन तालुक्यात कार्यक्षेत्र असल्याने या बाजार समितीच्या निवडणुकीला मोठे महत्व आहे. २१ सदस्यीय या बाजार समितीत सेवा सहकारी संस्था गटातून ११ संचालक, ग्रामपंचायत गटातून ४, अडते व्यापारी गट २, प्रकीया गट १, पंचायत समितीमधून १, निमंत्रित सदस्य १, नगरपरिषदेतून १ यांचा समावेश होतो. तुमसर तालुक्यात ९७ व मोहाडी ताुक्यातील ७५ ग्रामपचांयतीचे सदस्य येथील ग्रामपचांयतगट मतदानात भाग घेतात.सन २००९ मध्ये या बाजार समितीच्या निवडणूका झाल्या होत्या. दर पाच वर्षांनी निवडणूका घेण्याचा नियम आहे, या वेळी तब्बल ६ वर्षे ७ महिन्यानंतर निवडणूका होत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने एका याचिकेच्या सुनावणीत न्यायमूर्ती वासंती नाईक व ए. एस. चांदूरकर यांच्या पिठाने २४ फेब्रुवारी २०१६ ला चार महिन्यात तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. निवडणुकीपर्यंत जुनेच संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे.तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना सन १९६२ मध्ये झाली होती. सन १९७२ पासून बाजार समितीचे प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले होते. २ कोटीचे वार्षिक उत्पन्न या बाजार समितीचे आहे. अनेक राजकारण्यांना बाजार समितीची निवडणूक खुणावते. सध्या भाऊराव तुमसरे सभापती तर उपसभापती राजकुमार माटे आहेत. सन २००९ मध्ये निवडणुकीत काँग्रेस-राकां ने बाजार समितीवर कब्जा केला होता. सदर निवडणूका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाही. पक्षाचे पदाधिकारी निवडणूका लढवितात.सन २००४ मध्ये तत्कालीन खासदार शिशुपाल पटले सभापती असतांनी खासदारकीची निवडणूक जिंकले होते. तुमसर मोहाडी विधानसभेत भाजपचे आमदार चरण वाघमारे आहेत. त्यामुळे भाजप सक्रीय आहे. सहयोगी पक्षाचे शिवसेनेचे नवीन जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, काँग्रेस व राकां येथील निवडणुकीची मोर्चेबांधणीला लागले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी तुमसरचे असल्याने भाजप येथे पुर्ण ताकदीनीशी उतरण्याची शक्यता आहे. पुढील काळात ही निवडणूक राजकारणाला नवी दिशा ठरणारी राहणार आहे.
तुमसर-मोहाडी बाजार समिती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
By admin | Updated: March 26, 2016 00:25 IST