तुमसर : उपचार करून घरी परतणाऱ्या एका वृद्ध महिलेला भामट्याने दुचाकीने घरी सोडून देतो, अशी बतावणी करून काटेबाम्हणी शिवारात नेले. तिथे या महिलेच्या कानातील सोन्याचे टॉप्स व सोन्याची काळीपोत हिसकावून आरोपी पसार झाला. ही घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास काटेबाम्हणी शिवारात घडली. सखुबाई नत्थू भुरे (७०) रा. शिवनगर तुमसर असे या वृद्ध महिलेचे नाव आहे.सखुबाई भुरे या शहरातील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता गेल्या होत्या. उपचार करून घरी परत जात असताना रुग्णालयाबाहेर एक दुचाकीचालक सखुबाईजवळ थांबला. तुम्हाला घरी सोडून देतो, असे सांगून दुचाकीवर बसविले. विश्वास ठेऊन सखुबाई त्याच्या दुचाकीवर बसली. या भामट्याने दुचाकी तिच्या घराकडे न नेता त्याने हसारा मार्गे काटेबाम्हणी शिवारात नेली. तिथे दुचाकी थांबवून कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिणे हिसकावले. त्यानंतर दुचाकी घेऊन तो पसार झाला. दरम्यान दुसऱ्या दुचाकीने सखुबाई तुमसर येथे पोहोचून पोलीस ठाण्यात आपबिती सांगितली. चोरी गेलेल्या दागिण्यांची किंमत ३५ हजार रुपये असून याप्रकरणी तुमसर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
चोरट्याने पळविले महिलेचे दागिने
By admin | Updated: June 18, 2014 23:56 IST