तथागत मेश्राम वरठी
आजघडीला गुरू-शिष्याचे नाते हे व्यावसायिक झाले आहे. ज्याच्याकडे पैसे त्याला शिक्षण व जेवढे जास्त पैसे तेवढ्या सुविधा. अशा स्थितीत पैसा व मोबदला यात कशाचीही अपेक्षा न बाळगता आपली कला जिवंत राहावी यासाठी शिक्षणाचे धडे देणाऱ्या एका गुरुने गुरू-शिष्याची परंपरा जपली आहे. वरठी येथील शेकडो विद्यार्थ्यांना चित्रकलेचे मोफत ज्ञान देत त्यांच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे रंग भरत आहे. सूर्यकांत बांगरे असे या गुरुचे नाव आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यातून गुरुला मोबदला मिळतो. परंतु वरठी येथे कोणताही मोबदला किंवा अर्थार्जन न होता गुरू-शिष्याची परंपरा अविरत सुरू ठेवण्याचे काम बांगरे गुरुजी करीत आहेत. आपल्याला आवड असलेल्या कलेत परिसरातील विद्यार्थी पारंगत व्हावे व नावलौकिक करावे यासाठी ते चार वर्षापासून स्वत:च्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायासोबत चित्रकला जीवंत राहावी यासाठी झटत आहेत. त्यातल्या त्यात मुलांना प्रोत्साहित करुन त्यांना आर्थिक मदतही करीत आहेत. रंगाच्या दुनियेत सर्वांच्या आयुष्यात सप्तरंगांची भरभराट व्हावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांना चित्रकलाचे शिक्षण देऊन गुरूशिष्याच्या नात्यात सुर्यप्रकाशात उभे ठेवण्याचे काम करीत आहेत. सूर्यकांत बांगरे हे सोनार समाजाचे असले तरी त्यांचे मन मात्र सोनार व्यवसायात रमले नाही. त्यांचा फोटो फे्रमिंग, भांडे विक्री व ज्युस विक्रीचा व्यवसाय आहे. लहानपणापासून त्यांना चित्रकला या विषयात रस होता. सोन्याच्या मोहात न पडता निर्जीव चित्राच्या रंगात सोनेरी रंग भरून जगाला जिवंत कला दाखवण्याच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. तरूण वयात त्यांनी वरठी येथे चित्रकला शिकवण्याचे वर्ग सुरू केले होते. काही कारणास्तव व कुटूंबाची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे त्यांना शिकवण्याचा व्यवसाय बंद करून उदरनिर्वासाठी स्वत:च्या व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागले. परंतु मन मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. चित्रकलाचे वर्ग घेत असले तरी ते मुलाला यासाठी प्रोत्साहित करायचे. शिकवणी व मार्गदर्शन नसल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना यश मिळवणे कठीण जात होते. मागील एका दशकात वरठी येथून चित्रकला या विषयात आवड असणारे विद्यार्थी दिसेनासे झाले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नसल्यामुळे व शाळेत याबद्दलचे चित्रकला शिक्षक नसल्यामुळे त्यांना चिंता भेडसावू लागली. पाच वर्षापूर्वी सक्रिय होऊन ते या क्षेत्राकडे वळून चित्रकला शिकवण्याचे व्रत सुरू केले. चार-पाच विद्यार्थ्यांपासून सुरू केलेले हे व्रत आज शंभराच्या घरात पोहचली. शंभराच्यावर विद्यार्थ्यांना ते चित्रकलेचे धडे देत आहेत. तरूणाला लाजवतील, असे पन्नाशी ओलांडलेले सुर्यकांत बांगरे यांचा दिनक्रम आहे. दिवसाला १६ तास काम करून कुटूंबाकडे लक्ष देऊन आणि त्यातून वेळ काढून ते विद्याज्ञानाचे कार्य करतात. त्यांच्या कामात त्यांना पत्नी मदत करते. मुलगा अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत असून मुलगी दहाव्या वर्गात आहे. सूर्यकांत दररोज सकाळी ६ ते ८ शालेय विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवितात. त्यानंतर ८.३० ते १० पर्यंत दुकानात काम करतात. त्यांच्याकडून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून शुल्क घेत नाही. केवळ माझ्यात असलेली कला इतरांपर्यंत पोहचावी व ती जिवंत राहावी यासाठी ते नियमित झटत आहेत. चित्रकला परीक्षा शालेय जिवनात ऊत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र हे उच्च शिक्षणासाठी उपयुक्त ठरते. चित्रकला या विषयाच्या अभ्यास केल्यास स्वत:चे आयुष्य हे रंगाप्रमाणे फुलवता येते, हे सुत्र विद्यार्थ्यांना शिकवतात. मनातील कल्पना कागदावर जिवंत करीत असताना मोफत शिक्षणाबरोबर आर्थिक कुवत नसलेल्या परंतु योग्यता असलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य व पैसे पुरवण्याचे कामही ते करीत आहेत. सूर्याच्या तेज प्रकाशात माणसाला वेदना होतात. पण सूर्यकांतच्या चित्रकलेच्या तेज प्रकाशात परिसरातील विद्यार्थ्यांच्या रंगाने आनंद फुलताना दिसतात. कधीही सहभाग न घेणाऱ्या गावातून शेकडो विद्यार्थी नुसते सहभाग घेत नसून उत्कृष्ट निकालही देत आहेत. भविष्यात या क्षेत्रात वरठीचे नाव मोठे होऊन त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार होईल, अशी आशा करु या.