लाखांदूर : मित्राच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याच्या अंत्यसंस्कारसाठी मित्र धावून आला. त्यानंतर दुर्गाबाई डोह येथे अस्थिविसर्जन करण्यासाठी गेला असता डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्गाबाई डोहात घडली. सोहन वालदे (२२) रा.राजापूर ता.तुमसर असे मृतकाचे नाव आहे.सेंदूरवाफा येथील रजनीकांत तरजुले (२२) या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती सोहन वालदे याला मिळाली. माहिती मिळताच सोहन हा दोन मित्रांसोबत सेंदूरवाफा येथे अंत्यसंस्कारासाठी आला होता. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी अस्थीविसर्जनाकरिता सोहन कुंभली येथील दुर्गाबाई डोहावर गेला. अस्थीविसर्जनानंतर आंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सोहन खोल पाण्यात बुडाला. यातच त्याचा मृत्यू झाला. साकोली पोलिसांनी स्थानिक मासेमारांच्या सहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर सोहनचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
अस्थिविसर्जनादरम्यान बुडून मित्राचा मृत्यू
By admin | Updated: August 19, 2014 23:33 IST