पाऊस बेपत्ता : जूनअखेरपर्यंत जिल्हा कोरडाच, शेतकरी हवालदिलभंडारा : जून महिना संपायला येत असतानाही जिल्ह्यात पाहिजे तशी पावसाची दमदार हजेरी लागली नाही. मध्यंतरी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली होती खरी. मात्र पावसाने दडी मारल्याने केलेल्या पऱ्हे मातीत मिसळतात की काय? अशी अवस्था निर्माण झाली आहे. गतवर्षी खरिपाच्या हंगामात १३ जूनला झालेला दमदार पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सुरु होता. त्यावेळी अतिवृष्टीने तर यावर्षी पावसाअभावी शेतकऱ्यांना हैराण केले आहे. वरुणराजाची कृपादृष्टी केव्हा होईल, या आशेने बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जलसाठा अत्यल्प राज्यातील धरणांचा जलसाठा अल्प प्रमाणात उरलेला आहे. जलसाठ्याची सरासरी १९ टक्क्यांवर आली आहे. अल्प जलसाठ्यामुळे त्यावर अवलंबून असणारा शेतकरी चिंतेत असून पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर अवलंबून असलेल्या शहराची स्थितीसुद्धा बिकट आहे. उकाडा कायमजून महिना संपायला दोन दिवस शिल्लक असले तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. उन्हाची दाहकता कमी झाली नाही. कडक उन्हामुळे उकाडा कायम आहे. जून महिन्यातील या उकाड्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. बियाणांची साठवणूक पाऊस लांबल्यामुळे याचा परिणाम बाजारावर बघावयास मिळत आहे. शेतातील पेरण्या रखडल्यामुळे बियाण्यांची विक्री मंदावली आहे. त्यामुळे याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसत आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीच्या शक्यतेने बियाण्यांची व्यापारी वर्गाकडून अधिक साठवणूक होताना दिसत आहे. एकूणच मान्सून लांबल्याचा फटका शेतकऱ्यांसह नोकरदार सर्वांवर बसत असून सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पाऊस कुठे अडलासानगडी : यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊस कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने जून महिन्यापुर्वीच वर्तविला होता. मान्सून दाखल झाल्यावरही बरसत नसल्याने चिंता वाढली आहे. ७ जूनला मान्सून विदर्भात दाखल होता. मागीलवर्षी वेळेवर दाखल झाला होता. अतिवृष्टी झाली होती. यंदा जून महिना संपत आला तरी जिल्हा कोरडाच आहे. खरीप हंगामासाठी शेतजमिनीची तयार करून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवे येण्याची वेळ आली आहे. नागपूर विभागात सर्वधारणपणे १ ते २३ जून या दरम्यान १४७.३३ मि.मी. पाऊस पडतो. यावेळी या काळात केवळ ६४.४१ मि.मी. पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यात ६९.६४ मि.मी., वर्धा ६०.६६, भंडारा ५४.२९, गोंदिया ८९.६३, चंद्रपूर ४७.०१, गडचिरोली जिल्ह्यात ६३.४३ मि.मी. पाऊस झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पेरण्या रखडल्या
By admin | Updated: June 28, 2014 23:24 IST